
ईडीआडून राजकारण करणाऱया भाजपवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है, असं ट्विट करीत संजय राऊत यांनी बेताल बडबड करणाऱया भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
जय महाराष्ट्र!!@BJP4India @KiritSomaiya @AmitShah @AUThackeray @OfficeofUT pic.twitter.com/JHOFXlfB8t
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2020
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवरून भाजप नेत्यांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. या वक्तव्यांचा राऊत यांनी ट्विट करीत चांगलाच समाचार घेतला. ‘माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अचानक गोदी मीडियातले लहान कमळं फुलायला लागली आहेत. या राजकीय पोपटांचा वापर राजकीय कामांसाठी कशा पद्धतीनं केला जातोय हे जनतेला माहीत आहे. माझ्या कुटुंबाचं नाव पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्यामध्ये विनाकारण गोवण्यात आलंय. त्यांना मी आव्हान देतोय की पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है, अस ट्विट राऊत यांनी केलं आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि किरीट सोमया यांना टॅग केलं आहे.
सीबीआयला रोखले म्हणूनच ‘ईडी’, गृहमंत्री अनिल देशमुखांचा हल्ला
भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. पण आम्ही निर्णय घेतला राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल त्यामुळे ईडीचा वापर केला जात आहे, असे विधान करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या आडून भाजप सूडाचे राजकारण करीत असल्याची जोरदार टीका केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या सूडाच्या राजकारणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ईडीचा ज्या पद्धतीने राजकारणासाठी वापर होतोय ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आले नाही. भाजपकडून हे सुडाचं राजकारण भाजप करतेय ही अतिशय गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.
‘ईडी’चे अधिकारी मोदींचे गुलाम आहेत का? बच्चू कडू यांचा संतप्त सवाल
स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नव्हता. सध्या ईडीचे ऑफिस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरातून चालते. हातातल्या बाहुल्यांप्रमाणे ईडीला नाचवले जात आहे. ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम आहेत की घटनेला मानणारे अधिकारी आहेत, असा संतप्त सवाल शिक्षण राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.




























































