Sanjay Raut News – आताचे मुख्यमंत्री हे लोटांगणवीर, दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी घेतला समाचार

ज्यांनी आमचा पक्ष चोरला त्यांनी आम्हाला दिल्लीचे राजकारण शिकवू नये असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आताचे मुख्यमंत्री हे लोटांगणवीर आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला.

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसलेले हे लोटांगणवीर आहेत. गेल्या 60 वर्षात अनेक मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी जेवढे दिल्लीचे दौरे केले नसतील तेवढे दौरे आताच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. हे मुख्यमंत्री लोटांगण घालायला जातात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीशी झुंज दिली, त्याला स्वाभिमान म्हणतात. आज महाराष्ट्रातले राज्यकर्ते दिल्लीच्या दारावरचे पायपुसणं म्हणून बसले आहेत, त्याला लोटांगण म्हणतात. महाराष्ट्राचा इतिहास यांनी समजून घ्यावा. ज्यांनी आमचा पक्ष चोरला, ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं, ज्यांनी अशा चोऱ्या केल्या, ज्यांनी अशा लांड्या लबाड्या केल्या, त्यांनी आम्हाला दिल्लीचे राजकारण शिकवू नये. त्याच सोनिया गांधी यांच्या पाठिंब्यावरील सरकारमध्ये तुम्हीही सामील होतात असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस या माणसाने या राज्याचं राजकारण नासवलं, बिघडवलं हे मी परत सांगतो, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्र त्यांना यासाठी कधीच माफ करणार नाही. परमबीर सिंह हे आरोपी आहेत. फडणवीस यांचे काही पोपट आहेत. ते त्यांना मिरची आणि पेरू देत आहेत असेही राऊत म्हणाले.

मनीष सिसोदिया यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप करण्यात आले. पण भाजप ही मनी लॉण्डरिगची बादशाह आहे, भाजपने रिझर्व्ह बँकेत मनी लॉण्डरिंग केली आहे असेही राऊत यांनी सांगितले.