देवेंद्र फडणवीस हे ढोंगी देशभक्त आहेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला तसेच नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे यांची दाढी जाळली असेही संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांत अजित पवार यांच्या सोबत दिसले. मलिक यांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली होती, तर जनसन्मान यात्रेतही मलिक यांनी हजेरी लावली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई झाली होती. देवेंद्र फडणवीस हे नवाब मलिक यांच्यावर बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी काही खळबळजनक पुरावे दिल्याने ईडी, सीबीआयला त्यांच्यावर कारवाई करावी लागली. आज नवाब मलिक सरकारमध्ये आहेत. फडणवीसांना माझा प्रश्न आहे की जेव्हा नवाब मलिक विधानसभेत सत्ताधारी बाकांवर बसले होते तेव्हा फडणवीसांनी नीतीमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं. फडणवीसांनी एकतर ते पत्र मागे घ्यावं, किंवा जाहीर करावं की मलिक यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत आणि त्यांच्यावर सगळे खटले सुडबुद्धीने आम्ही दाखल केले होते. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिकांबाबत लिहिलेलं पत्र हे ऐतिहासिक आहे. ते राष्ट्रभक्तीचे ऐतिहासिक कागदपत्र आहे असेही संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिक अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करीतआहेत.आता देवेंद्र फडणवीस यांच्या देशभक्तीचे कसेकाय होणार?
एकनाथ शिंदे यांचा देखील हाच कांगावा होता. आता हे दोघे काय करणार?
देवेंद्रजी आपलेच हे पत्र पुन्हा वाचा!
एकतर पत्र मागे घ्या नाहीतर मलिक यांच्यावरील आरोप मागे घ्या. pic.twitter.com/jV9VM5ioOF— Sanjay Raut (@rautsanjay61) August 20, 2024
तसेच मुलुंडचा एक नागडा पोपट आहे, त्याने एक भुमिका घेतली की नवाब मलिक देशद्रोही आहेत. मलिकांना तुरुंगात डांबलं. त्यांचा संबंध दहशतवाद्यांशी आहे असा आरोप केला गेला. असे नसताना आरोप केले गेले. आता नवाब मलिक जामिनावर सुटले तेव्हा ते सत्ताधारी बाकांवर बसले. तेव्हा फडणवीस चिडले. दहशतवाद्यांशी संबंधित व्यक्तीला महायुतीत स्थान नाही असे फडणवीस म्हणाले होते असेही संजय राऊत म्हणाले.
नवाब मलिकांनी एकनाथ शिंदेंच्या दाढीला आग लावली आहे. देवेंद्र फडणवीस गेली 10 वर्ष महाराष्ट्राशी खोटं बोलत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत असेही संजय राऊत यांनी नमूद केले.