
फडणवीसांचा जेव्हा जन्मही झाले नव्हता तेव्हा स्वातंत्र्यवीर ही पदवी सावरकरांना महाराष्ट्राने दिली, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष काढून दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर यांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती. तो ऐतिहासिक ठेवा आहे. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमधलं राहतं घर सरकारने ताब्यात घेऊन तिथे स्मारक उभारलं आम्ही त्याचं स्वागत केलं. आता एक तलवार आणली होती. या तलवारीवरून वाद सुरू आहे, ही खरी आहे की नाही. वाघनखांवरून वाद झाला होता. भवानी तलवार आणण्याविषयी चर्चा होते, प्रचंड गाजावाजा करत ती वाघनखं आणली. आता ही वाघनखं कुठे आहेत? निवडणुकीच्या आधी याची प्रदर्शनं भरवली. वीर सावरकरांची बॅरिस्टर ही पदवी आणण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. पण खरी पदवी आणा. तो कागदाचा तुकडा जरी ब्रिटिशांनी जप्त केला तरी आम्ही त्याला बॅरिस्टर मानतो. पण या देशाची मागणी वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे. कालसुद्धा दिल्लीत पद्म पुरस्काराचा सोहळा झाला. आम्हाला वाटत होतं की सावरकरांना भारतरत्न दिला जाईल. तुम्ही त्यांच्या सगळ्या वस्तू आणाल. पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे, त्यांच्या विचारधारेचा. तर भारतरत्न देऊन टीकाकारांची तोंड बंद करण्यात आहे. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत ती शिफारस का केली नाही. मोदी आणि शहांनी यांच्या अखत्यारित असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? हा साधा प्रश्न आहे आमचा? बॅरिस्टरची पदवी आणा, तिकडे जिथे त्यांनी समुद्रात उडी मारली तिथे जाऊन तुम्ही डोकं टेकवाल. हे वर्षानुवर्ष आम्ही करतच आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शहा आणि फडणवीसांची गरज नाहीये. तसेच स्वातंत्र्यवीर ही त्यांना सर्वोच्च पदवी या महाराष्ट्राने दिलेली आहे. वीर ही पदवी मोदी शहांनी दिलेली नाही किंवा भाजपने दिलेली नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने त्यांना दिली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच नारायण राणेंना माझा असा प्रश्न आहे की पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच. पण तुमचे मोदी ज्यांनी पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले होते ते दंड फुसके आहेत का? प्रेसिडेंट ट्रम्पने पाकिस्तानात घुसलेल्या भारतीय सैन्याला माघारी का बोलावलं हे आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करावं असे संजय राऊत म्हणाले. ऑपरेशन सिंदूर हे चालवलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त कश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना मोदींनी आणि भाजपवाल्यांनी केली. त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्याव. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना पाठवायचं? आम्ही नाही गेलो पाकिस्तानमध्ये. नरेंद्र मोदी नवाज शरीफचा केक कापायला गेले. ते राणे विसरलेले दिसतात. नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं? तर तुमचे नरेंद्र मोदी गेले. मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी. आणि त्यांनी आपला वयाचं तरी भान ठेवावं. आपलं वय झालेलं, आपल्या टोपाचे केस पण पिकले. याचं त्यांनी भांन ठेवाव आणि प्रगल्भ वक्तव्य करा. तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात. जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकोळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष. तुम्ही भाजपचे आश्रित आहात. माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे 20 आमदार आणि नऊ खासदार आहेत. भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणावं. फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका. स्वतःचे ते सुद्धा आकडे मोजा. जी लढाई झालीच नाही निवडणुकीत त्यातला हा विजय आहे. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्यांनी पाय खेचले त्यांच्या शौर्याचे पोवाडे राण्यांनी गाऊ नये एवढंच मी त्यांना सांगतो असेही संजय राऊत म्हणाले.