पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय माफी मागितली आहे, महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही माफी मागितली आहे असेही राऊत म्हणाले.
आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरून कोसळला. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा कोसळला. त्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल, त्यामुळे मोदींनी राजकीय माफी मागितली. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितलेली बरी, यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम, महाराष्ट्रावरचं प्रेम, आत्मीयता असण्याचे कारण नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतोय. पंतप्रधानांनी मागितलेली माफी ही संपूर्णपणे राजकीय स्वरुपाची आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी ही माफी मागितलेली आहे. पण या माफीमुळे प्रश्न सुटत नाही. ज्या घोर प्रकारचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात झाला आहे, या सरकारकडून झाला आहे. मोदींनीची निर्माण केलेले हे हे सरकार आणि संकट आहे. महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे काम करेल असेही संजय राऊत म्हणाले.
मोदींनी जरी माफी मागितली तरी उद्यापासून या राज्यभरात जोडे मारण्याचे आंदोलन सुरूच राहणार. उद्या 11 वाजता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासह सर्व घटकपक्ष लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि महाराजांचा अपमान केल्याबद्दल सरकारला जोडे मारतील. पंतप्रधानांना या घटनेचं गांभीर्य असतं किंवा दुःख असतं तर पाच वर्षांपूर्वी पुलवामात आमच्या 40 जवानांची हत्या झाली, तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती. जम्मू कश्मीरमध्ये पंडितांवर अत्याचार होत आहे, त्याबद्दल माफी मागितली असती. महिलांविरोधात अत्याचार झाले होते त्यावर माफी मागितली असती. पण प्रत्येकवेळेला निवडणूक समोर ठेवून पावलं टाकायची, कृती करायची, ही आमच्या पंतप्रधानांची खासियत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची मागितलेली माफी ही त्यांची व्यक्तिगत विषय आहे. हा राजकीय विषय आहे. ही माफी आपण मागितली नाही तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही हे तुम्हाला कळेल. या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी शिवरायांच्या अपमानात जी भुमिका बजावली आहे त्याचा तपास कोण करणार, आरोपींना अटक कोण करणार? शिल्पकाराला काही कोटींची सुपारी कोणी दिली? त्यांची नावं कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केलेले आहे, त्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्यामागे ठाणे कनेक्शन आहे. या ठाणे कनेक्शनमधील एक मंत्री आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर त्यांचा राजीनामा कोण घेणार? असेही संजय राऊत म्हणाले.
आधी सावरकरांची माफी मागा
छत्रपती शिवरायांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. म्हणून मी म्हणतोय की ही राजकीय माफी आहे. पंतप्रधान मोदींना यात राजकारण आणायचं आहे. वीर सावरकरांचा प्रश्न पुर्णपणे वेगळा आहे. वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही. वाटल्यास सावरकरांचे सहा सोनेरी पाने हे पुस्तक पंतप्रधानांना पाठवू. सावरकरांचा विषय हा पुर्ण वेगळा आहे. पण तुम्ही अद्याप सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित का केले नाही? त्याबद्दल आधी सावरकरांची माफी मागा.