
माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड सारखे नमुने देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात घेतले आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीत हाती घ्यावीच लागणार असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचं कुणाला काढायचं आणि कुणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे आहे. मुख्यमंत्री काल दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. पण त्यांचा मुख्य हेतू हा मंत्रिमंडळात जो गोंधळाचे वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेली आहे. त्यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी दिल्लीत बैठक झाली होती. मी गेल्या काही दिवसांपासून सांगत आहे की या मंत्रिमंडळातील चार मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय राठोड यांचंही नाव समोर येत आहे. पण चारवरून संपूर्ण मंत्रिमंडळ साफ करून वेगळ्या चेहऱ्याचे मंत्रिमंडळ आणा अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी विधानं, लेडिज बार, घोटाळे पैश्यांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे, यामुळे बिघडलेली प्रतिमा या सगळ्यांचं ओझं फडणवीसांवर कल्पनेपलीकडे गेलेलं आहे. हे ओझं त्यांना पेलवता येत नाहिये आणि ते फेकताही येत नाहिये. खरं म्हणजे ज्यांच्याकडे 137 चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे वाकून जाता कामा नये. तरी ते वाकलेले आहेत आणि त्यांचं ते काम करत आहे. जसं की काल झारखंडमधून एसीबीचं एक पथक आलं आणि त्यांनी अमित साळूंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले. सुमित फॅसिलिटी, 800 कोटी रुपयांचा रुग्णवाहिका घोटाळा. जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटी रुपयांचं टेंडर 800 कोटी रुपयांना गेलं. हे तेच सुमित फॅसिलिटीची अॅम्बुलन्स, 108 क्रमांकाची अॅम्बुलन्स. मी स्वतः हा विषय काढला होता. याचे सूत्रधार अमित साळूंखे आहेत. 650 कोटी रुपयांनी टेंडर वाढवलं गेलं. हा सर्वात मोठा घोटाळा आहे. अमित साळूंखे हे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनचे आहेत. त्याचा आर्थिक कणा आहे. मोठ्या प्रमाणात हे पैसे शिंदेंकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनची चौकशी करण्याची मी मागणी करणार आहे. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातची चौकशी करणारे एक पथक इथं आलं त्यांनी अमित साळूंखेला अटक केली. अमित साळूंखे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. या पैश्याला कुठे पाय फुटलेत, कुणाच्या खात्यात गेलेत हे सरकारला प्रत्यक्ष शोधायचे आहे. आणि हे धागे दोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात. असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही. झारखंड मधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदे यांच्या बाळराजाच्या अत्यंत जवळ असलेल्या व्यक्तीला घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल. आणि 800 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात हा बाहेर येईल. मद्य घोटाळ्यात किती अडकले, कुणाच्या फाऊंडेशनला किती पैसे गेलेत, निवडणुकीसाठी किती वापरले, कसे वापरले हे सगळं आता बाहेर पडणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाची साफसफाई मोहीत हाती घ्यावीच लागणार आहे असे संजय राऊत म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना दुसरे मंत्रिपद दिले जाईल अशी माहिती आहे. पण या अफवा आहेत. माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढून टाकावं लागेल. शेतकऱ्यांचा अपमान खातेबदल केल्याने दूर होईल का? कृषीमंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून ते पाप धुवून निघेल का? अजित पवारांना हे मान्य आहे का? स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजता, स्वतःला शेतकरी समजता. माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड असतील. हे सगळे नमुने तुम्ही मंत्रिमंडळात घेतले आहे. राज्य कसे चालवता तुम्ही. हर्षल पाटीलने केलेली आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही, आणि हर्षल पाटील हा कंत्राटदार होता की नाही ही माहिती तुम्ही आणता. एक तरुण आत्महत्या करत आहे आणि त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट आहे, तरी ते सरकार ही आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, इतकं निर्ढावलेलं सरकार महाराष्ट्रात काम करतंय. हा घोटाळा गुलाबराव पाटील यांच्या खात्यातला घोटाळा आहे. आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या, आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले. आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी आत्महत्या करू असे आव्हान दिले आहे. अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या आहेत. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडीपुढे आत्मदहनाचा प्रयत्न झाला. जुलाबराव पाटील काय सांगतो? हे सगळे मंत्रिमंडळातले राक्षस, रावण आहेत, हे कसले रामाचे राज्य चालवत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
सुमित साळुंखे लक्षात ठेवा मी वारंवार सांगतोय. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनमध्ये कसा भ्रष्टाचाराचा पैसा आला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आणि याच पैश्यातून झारखंडचा मद्य घोटाळा त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर कोण आहे हे लवकरच कळेल.
देवेंद्र फडणवीस हे गोंधळलेले आहेत. आपण महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे मुख्यमंत्री आहोत हे ते विसरत आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा आणि मार्गदर्शन केलं, ज्या राज्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये एक महान भूमिका बजावली, आणि हे राज्य झगडून मिळवलेले आहे. हे राज्य आकाशामधून पडलेले नाही किंवा जमिनीतून उवलेले नाहिये. कारण हे राज्य निर्माण झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता. हे राज्य मराठी आहे, मराठी आलंच पाहिजे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. हे राज्य पूर्ण मराठी होतं, मराठी आहे आणि राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. मावळ्यांची भाषा, क्रांतिकारकांची भाषा मराठी होती, हे देवेंद्र फडणवीसांना कळलं पाहिजे. महाराष्ट्राने कधीच दुसऱ्या भाषांचा द्वेष किंवा दुःस्वास केला नाही आणि करणा नाही, हे सुद्धा फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी दिल्लीचा विचार करू नये, त्यांनी महाराष्ट्राचा विचार करावा. आम्ही मराठी लोकं सर्वसमावेशक आहोत, म्हणून या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक गुण्या गोविंदाने नांदतात. मुंबईसह आसपास इतर राज्यांची सदनं उभी आहेत. ओरीसा, उत्तर प्रदेश भवन आहेत. फडणवीस या टर्ममध्ये कच्च्या लिंबूसारखे वागत आहेत.
महाराष्ट्राचं सरकार हे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेलं आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेवर आलं आहे ते अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टीवर काम करतात असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.