संजय राऊत यांचे तुरुंगातील ‘ते’ 100 दिवस; ‘नरकातला स्वर्ग’ची दिल्लीत उत्कंठा हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचे उद्या प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं, राजकीय वर्तुळात वादळ उठवणारं आणि खपाचे विक्रम रचणारं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक आता इंग्रजी आणि हिंदी वाचकांच्या भेटीला येत आहे. ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाची ‘अन्लाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी आणि ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्ती प्रकाशनासाठी सज्ज असून राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिटय़ुशन क्लब, मावळणकर सभागृह येथे सोमवार, 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार दिग्विजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन, खासदार जया बच्चन, 4 PM न्यूजचे मुख्य संपादक संजय शर्मा यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.

भाजपच्या सूडाच्या राजकारणातून ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. 100 दिवस त्यांना आर्थर रोड तुरुगांत ठेवण्यात आले होते. तुरुंगाच्या चार भिंतींच्या आतही त्यांची लेखणी थांबली नव्हती. तिथे आलेल्या अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिले आणि त्यातूनच ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक साकारले. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन गेल्या वर्षी 17 मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झाले. या पुस्तकाला दहा महिन्यांत वाचकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. विक्रमी खप झाला. देशभरात पुस्तकाची चर्चा झाली. त्यातून या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीही प्रसिद्ध व्हावी, असा आग्रह होता. या विनंतीला मान देऊन संजय राऊत यांचे हे पुस्तक हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येत आहे.

दैनिक ‘सामना’ आणि न्यू ईरा पब्लिशिंगतर्फे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होणार आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक शरद तांदळे आणि दैनिक ‘सामना’च्या मार्पेटिंग डेव्हलपमेंट विभागाचे नॅशनल हेड दीपक शिंदे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

जुलमी सिंहासने… सत्य घटनांचं थरारक चित्रण

हे पुस्तक म्हणजे कादंबरी नव्हे, तर जळजळीत सत्य आहे. यातील प्रत्येक प्रसंग सत्यघटनेवर आधारित आहे. निर्दोषांना गुन्हेगार ठरवण्यासाठी जुलमी सिंहासने कोणत्या थराला जाऊ शकतात, किती हीन पातळी गाठू शकतात याचे थरारक चित्रण संजय राऊत यांच्या लेखणीतून पुस्तकात उतरले आहे. त्यामुळे या पुस्तकाची राष्ट्रीय पातळीवर हिंदी आणि इंग्रजी वाचकांना उत्कंठा लागून राहिलेली आहे.

स्थळ ः मावळणकर सभागृह, कॉन्स्टिटय़ुशन क्लब, नवी दिल्ली

वेळ ः सायंकाळी 6 वाजता