
मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी मोर्चा’ला घाबरलेल्या सरकारने प्रचंड दडपशाही सुरू केली आहे. पोलीस प्रचंड राजकीय दबावाखाली असून मोर्चा निघू नये म्हणून जमावबंदीच्या नोटिसा काढण्यात आल्या असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मिंध्यांवर जोरदार हल्ला चढवला.
संजय राऊत म्हणाले की, मीरा-भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कुणाच्या दबावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली? महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले पाहिजे.
मीरा-भाईंदरमध्ये सर्वपक्षीय झेंडे बाजुला ठेऊन एक प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात येत आहे आणि या मोर्चाची परवानगी मागितली गेली. आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते, मग परवानगी नाकारली जाते. अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना पहाटे दोन, तीन वाजता जाऊन अटक केली जाते. हे राज्य महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की मराठी मुख्यमंत्री आहे की मोरारजी देसाई यांचा आत्मा फडणवीस यांच्या शरीरात गेलाय आणि त्यानुसार ते असे अघोरी काम करू लागलेत? मला भीती वाटते फडणवीस एक दिवस मराठी माणसावर मोरारजी देसाईंप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील, असा टोला राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांना मोर्चा काढू नका म्हणून नोटीस बजावण्यात आली. मग त्यांना अटक करण्यात आली. कशासाठी आणि कुणीसाठी? तुमच्यावरती कुणाचा दबाव आहे? महाराष्ट्रात आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही का?
अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई
हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती अशाच न्याय हक्कांसाठी. तुम्ही आम्हाला सांगता बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही काय करताय? तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरून खाली खेचून हुतात्मा चौकात आणले पाहिजे. डुप्लीकेट शिवसेनावाले, अर्ध्या दाढीवरून हात फिरवणारे कुठे आहेत? जनता इतकी चिडली आहे की अर्धी दाढी कापून महाराष्ट्रभर फिरवेल अशी वेळ आली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मिंध्यांची सालटी काढली.