भाजपला स्वप्नदोष विकार जडलाय; 2024 ला 240 वर अडकले, 2029 ला 140 खाली जाणार! – संजय राऊत

‘भारतीय जनता पक्षाला स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. काल ते नवी मुंबईमध्ये गल्लोगल्ली फिरत होते. हे त्यांना शोभत नाही. त्यांनी राष्ट्राचा विचार करायला हवा. 2024 ला ते पूर्ण बहुमताचे सरकार आणू शकले नाहीत, 2029 खूप लांबची गोष्ट आहे. तोपर्यंत सरकार राहतंय की नाही त्याचा विचार करा’, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवलेल्या नियमानुसार त्यांना 75 वर्षानंतर निवृत्त व्हावे लागेल. 2024 ला भाजप 240 वर थांबलेला होता, 2029 च्या निवडणुकीत 140 हून खाली येईल’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, ‘यंदाच्या निवडणुकीत लांड्या-लबाड्या करून थोड्याफार जागा त्यांनी चोरल्या, पण 2029 ला ते शक्य नाही.’

‘महाराष्ट्र, हरयाणा आणि जम्मू-कश्मीरमध्ये भाजपचा पराभव होतोय. पण स्वप्न पहायला हरकत नाही. कारण स्वप्न पाहणाऱ्यांवर ईडी, सीबीआय छापा टाकू शकत नाही. ईडी, सीबीआय हीच अमित शहा यांची ताकद आहे. उद्या ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही आमची सत्ता येईल म्हणतील. त्यामुळे भाजपने खुशाल स्वप्न पहावे. पण देशातून भाजपचे अधःपतन सुरू झालेले आहे’, असेही संजय राऊत म्हणाले.

शहांनी विरोधी पक्षाच्या कायकर्त्यांना फोडण्याचे आवाहन केले. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ‘वारंवार ते याबाबत बोलत आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते, मतदार नाहीत. त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले गद्दार नेते आहेत. गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही, हे अमित शहांना फार लवकर कळलेले आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

‘अमित शहा यांनी भाजपची जी अवस्था आहे त्याचे चित्र समोर आणले आहे. आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत. आमच्याकडे फक्त ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा आणि पैसे आहेत. त्याच्याच जोरावर आम्ही सत्तेवर आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे’, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.