कलम 370 रद्द करून मोदी-शहा जोडीनं स्वत:चे ढोल वाजवले, पण कश्मिरात काहीही बदललं नाही! – संजय राऊत

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून आज 6 वर्ष पूर्ण झाले. मात्र सहा वर्षात काहीही बदलले नाही. 370 रद्द झाल्यानंतर फक्त मोदी, शहा आणि भाजपने स्वत:चे ढोल वाजवून घेतले. या पलीकडे कश्मीरमध्ये कोणताही बदल झाला नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले की, 6 वर्षात कश्मीरमध्ये काहीही बदलले नाही. भारतीय घटना जरी तिथे लागू झाली असली तरी घटनेनुसार तिथे कोणतेही काम होत नाही. भारतीय नागरीक आजही तिकडे जाऊन जमीन खरेदी करत शकलेला नाही. मोदींनी दाखवलेले मोठ्या गुंतवणुकीचे स्वप्नही पूर्ण झालेले नाही. काश्मीरमधील जनतेला, तरुणांना रोजगार मिळालेला नाही. हिंसाचार, दहशतवाद थांबलेला नाही.

पहलगाममध्ये काय झाले हे आपण पाहिले. ही एक मोठी घटना समोर आली. अशा लहान घटना तिथे वारंवार घडत आहेत. तिकडले सरकार लोकशाही मार्गाने निवडून आले असले तरी त्या सरकारला कोणतेही अधिकार नाही. ते राज्य केंद्रशासित झालेले असून त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले.

370 रद्द झाल्यानंतर फक्त मोदी, शहा आणि भाजपने स्वत:चे ढोल वाजवून घेतले. या पलीकडे कश्मीरमध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसत नाही. 370 कलम रद्द केल्यानंतर कश्मीर दहशतवाद मुक्त होईल हे मोदी-शहांचे वक्तव्य पूर्णपणे अपयशी ठऱले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आजही पर्यटक काश्मीरला जायला घाबरतात, असे राऊत म्हणाले. जम्मू-कश्मीर हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. जम्मू-कश्मीर राज्याशिवाय हिंदुस्थानचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही. या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, त्यांना त्यांचा अधिकार मिळावा ही आमची मागणी कायम असल्याचेही ते म्हणाले.

…तर आम्हीही पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

दरम्यान, विधिमंडळात झालेल्या हाणामारीचा अहवाल सादर होणार असून यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, असे खूप अहवाल येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकि‍र्दीत अनेक विषयांवर एटीएस, एसआयटी, समित्या नेमण्यात आल्या. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्याच्या विश्राम गृहात 1.80 कोटी रुपये सापडले. ही रोकड अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्यासाठी धुळ्याच्या ठेकेदारांकडून गोळा करण्यात आली होती. त्याचे काय झाले? एटीएस नेमली होती, त्याचे काय झाले?

फडणवीस फक्त समित्या नेमतात, त्याचे पुढे काहीही होत नाही. आज महाराष्ट्रात त्यांना फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांना दबावात आणायचे आणि खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना तडीपार करायचे एवढेच उद्योग राहिले आहेत. अहिल्यानगर येथे शिवसेनेचे पाच वेळचे आमदार दिवंगत अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. अनिल राठोड यांनी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वासाठी मोठे काम केले. आज त्यांचा स्मृती दिन आहे. पण त्यांच्या चिरंजीवाला अहिल्यानगरमध्ये यायला बंदी आहे. कारण पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. फडणवीसांच्या पोलिसांचे हे काम आहे. याआधी तिकडले शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. फडणवीस यांना गृहखाते यासाठीच हवे का? हेच काम असेल तर पुढे येणारी सरकारेही अशाच पद्धतीने कामे करतील, असेही राऊत यांनी ठणकावले.