फडणवीसांना शिकारीचा नाद! टप्प्यात आली की बार उडवणार; खरात फाईल्सवरून संजय राऊत यांचे सुचक विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘भोंदू खरात बाबा’ प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत अत्यंत सूचक विधान केले आहे. हे प्रकरण साधे नसून याला मोठे राजकीय अँगल आहेत. या प्रकरणाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अनेक नेत्यांची शिकार केली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अशा शिकारीचा नाद असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.

संजय राऊत यांनी पोलीस तपासातील गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, खरात बाबाच्या प्रकरणात कोण किती मिनिटे कोणाशी बोलले, ही अत्यंत गोपनीय माहिती असते. पण मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने ती माहिती बाहेर आली.  गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री त्यांच्या मदतीशिवाय सीडीआर तुम्हाला मिळू शकणार नाही.कोणाला तरी जाणीवपूर्वक ही माहिती बाहेर काढायची आहे. त्यामुळे हे तर सत्य आहे की खरात बाबाच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जातील, असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की,राजकीय बळी घेणे हा देवेंद्र फडणवीस यांचा छंद आहे. सुधाकरराव नाईक यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते—’शिकार टप्प्यात आली की बार उडवायचा.’ फडणवीस जरी सुधाकरराव नाईक नसले, तरी त्यांना अशा प्रकारच्या शिकारीचा नाद नक्कीच आहे. खरातच्या माध्यमातून आता आपोआप अनेकांचे बळी जातील, असेही त्यांनी नमूद केले.

आता खरात हा विषय मागे पडलाय आणि खरातच्या माध्यमातून जी शिकार होणार आहे ते महत्त्वाचं आहे, असे राऊत म्हणाले. खरातला फाशी होईल की जन्मठेप, यापेक्षा पोलीस तपासात जे कागदावर उतरले आहे आणि त्यातून जे ‘खरात फाईल्स’ बाहेर येतील, त्याने राजकारणात मोठे वादळ येईल ते महत्त्वाचं आहे, असा इशारा त्यांनी दिला. खरातच्या चरणाशी बसून मंत्रिमंडळातील जे मंत्री आणि नेते उपदव्याप करत होते, त्यांचे पितळ आता उघडे पडेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.