केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जम्मू-कश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र वेगवेगळी कारणं देत महाराष्ट्रातील निवडणूक पुढे ढकलली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करतात, दुसरीकडे चार राज्यातील विधानसभा निवडणूकही एकत्र घेऊ शकत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्रातील निवडणुका का जाहीर करण्यात आल्या नसाव्यात असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मिंधे सरकारचा समाचार घेतला. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती फोडून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ सांगतात. पण ते महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-कश्मीर या चार राज्यातील निवडणुकाही एकत्र घेऊ शकत नाही. मोदी ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करतात. ते खोटारडे असून लोकांना मुर्ख बनवतात. महाराष्ट्र, झारखंडमध्ये हरण्याची भीती असल्याने त्यांना जास्त वेळ हवा आहे. त्यामुळेच या दोन राज्यातील निवडणुका घ्यायला तयार नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली.
मिंधे सरकारला ‘लाडकी बहीण’ योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात निवडणूक घेत नाहीत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणता ना, मग करा सुरुवात. घ्या वेळेत निवडणूक. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मागणी करावी, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मोदी लाल किल्ल्यावरून खोटं बोलतात. मोदी लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारे पंतप्रधान आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या घोषणा करता मग चार राज्याच्या निवडणुका एकत्र घ्या. चार राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करतात, आले मोठे.
लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट ठरेल का असे विचारला असता राऊत म्हणाले की, अजिबात नाही. कदाचित महायुतीसाठी ही योजना यू टर्न ठरेल. मिंधे सरकारने फार मोठी क्रांती केलेली नाही. महाराष्ट्रात महिलांसाठी अशा अनेक योजना आलेल्या असून हे दीड हजार रुपयेही फडणवीस, अजित पवार आणि मिंधे स्वत:च्या खिशातून देत नाहीत. हा लोकांच्या करातील पैसा असून या योजनेचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे. आमचे सरकार आल्यावर दीड हजाराचे तीन हजार करू हा आमचा शब्द आहे.