…हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल; संजय राऊत यांनी भाजपला सुनावले

महाराष्ट्राचा तडफदार नेता आणि जनसामान्यांचा ‘कामाचा माणूस’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपने पानभर जाहिराती दिल्या, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत परखड प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतं. दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ होते. त्या स्तंभावर अनेकांचं राजकीय आयुष्य उभ होतं. दादा वन मॅन आर्मी होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र धक्क्यात आहे, अजित दादांचं असं अचानक जाणं हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकलेला नाही.

अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाजपने पानभर जाहिराती दिल्या आहेत. त्याचाही संजय राऊत यांनी परखड शब्दांत समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे संजय राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.