
मुंबई महापालिका प्रशासनाने प्रशासकीय काळात काढण्यात आलेली 1 हजार कोटी रुपयांची टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय राजवटीत नगरविकास खात्याच्या अखत्यारीत मोठा भ्रष्टाचार झाला आणि मुंबई लुटली गेली, असे राऊत म्हणाले. ते जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक कुणाचे होते? नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे होते. महानगरपालिका नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. साडे तीन वर्ष मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महापालिकेत प्रशासकीय राज चालू होते. त्या काळात नगरविकास खात्याच्या माध्यमातून महानगरपालिकांमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. त्यामुळे आता एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे टेंडर रद्द केले असेल मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचे अभिनंदन केले पाहिजे. प्रशासकीय काळात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आणि मुंबई लुटली गेले हे आम्हीही सातत्याने सांगत होतो, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत गोंधळ सुरू असून आगामी काळात हा पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर शिंदे गटातीलही एक मोठा गट भाजपमध्ये विलीन होईल. जळगावचे शिंदे गटाचे सर्व आमदार गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जातील, ही माझी पक्की माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.
राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राहुरीमध्ये याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे यांनी चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली होती. त्या जागेवर राष्ट्रवादीचा अधिकार आहे. बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड येथेही काँग्रेस आधी निवडणूक लढवायला जाते आणि निकालानंतर ते कुठे आहेत हे शोधावे लागते. लोकसभा आणि विधानसभेवेळी ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावे हा महाविकास आघाडीचा आधार होता. त्यामुळे राहुरीमध्ये राष्ट्रवादीची ताकद असेल तर महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी बसून निर्णय घ्यावा लागेल.
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक आपतधर्म म्हणून कदाचित शरद पवार यांचा पक्ष निवडणूक लढणार नाही. पण इतर कुणी लढत असतील तर त्यांना विरोधही करता कामा नाही. कारण ही लोकशाही आहे. त्या संदर्भातही एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, असेही संजय राऊत यावेळी स्पष्ट म्हणाले.


























































