
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना केलेल्या भाषणात पाकिस्तान युद्धबंदीसाठी हिंदुस्थानकडे भिक मागत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पाकिस्तान जर युद्धबंदीसाठी भिक मागत होता तर POK नाही तर किमान कुलभूषण जाधवला तरी मागायचे होते, अशा शब्दात त्यांनी भाजपला फटाकरले.
”सरकार बोलतेय की पाकिस्तान आमच्यासमोर भिक मागत होता, हात जोडून युद्धबंदीसाठी आपल्याला विनंती करत होता. युद्धविराम करून आपल्याला काय मिळालं. युद्धविरामाच्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? चर्चा पाकव्याप्त कश्मीरवर होणार होत होती. पाकव्याप्त कश्मीर तर मिळाले नाही. किमान गेल्या पंधरा वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात तडपत असलेल्या आपल्या कुलभूषण जाधवची तरी सुटका करायची होती, आपले मच्छिमार जे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत त्यांना सोडवायचे होते, असे संजय राऊत म्हणाले.