
मुंबई, महाराष्ट्रासह तमाम मराठी माणसाचे लक्ष शिवसेना-मनसे युतीच्या घोषणेकडे लागले आहे. मुंबईचे अस्तित्व आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठी ही युती होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या युतीची घोषणा धूमधडाक्यात आणि वाजतगाजत होणार आहे. हा क्षण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन भावांचे मनोमिलन झाले आहे. एकत्रिकरण झालेले आहे. आता राजकीय युती म्हणाल तर महापालिकेसाठी मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली या ठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणच्या चर्चा संपलेल्या आहेत. तरीही मोठय़ा महापालिका असल्याने शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जात आहे. उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे पण त्याआधी शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
हा प्रीतीसंगम!
हे नाटक हीट ठरेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ‘हे नाटक नाही, प्रीतीसंगम आहे आणि महाराष्ट्राची जनताही या प्रीतीसंगमामध्ये सहभागी होईल,’ असे संजय राऊत म्हणाले. नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे. चांगल्या नाटकाची तिकिटे तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकांची तिकिटे मालक स्वतः खरेदी करून रिकाम्या थिएटरपुढे शो हाऊसफुल्ल असल्याचे नाटक करतात. तसा कालचा शो हाऊसफुल्ल नव्हता, पण त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करून तिकिटे खरेदी केली गेली आणि विकत दिली गेली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.



























































