
शिवसेनेचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमचे 9 खासदार आहेत आणि पुढली निवडणूक होईपर्यंत 9 राहतील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत दिल्लीत ठामपणे म्हणाले. शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’बाबत विधाने केली जात असून याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले की, आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमचे 9 खासदार आहेत आणि पुढली निवडणूक होईपर्यंत 9 राहतील. वारंवार ज्या बातम्या पेरल्या जात आहेत, ही एक विकृती आहे. हे पारदर्शक राजकारण नाही. महाराष्ट्रात आणि देशातही राहिलेले नाही.
शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार… ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार… तुमच्या खुर्चीखाली सुरूंग लागलेत ते आधी बघा. हे सुरूंग भाजपनेच लावले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केले पाहिजे. शिवसेना आहे त्या परिस्थितीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना तुम्हाला दिसेल. चिंता करू नका, असेही राऊत म्हणाले.
राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतो. विशेषत: जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो. ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुताऱ्या’ या चर्चा महाराष्ट्रात सातत्याने सुरूच राहणार आहेत. सत्ताधारी पक्षाला कोणताही कामधंदा उरलेला नाही. त्यांच्याकडे चांगले काही करावे, विकासाच्या दृष्टीने बोलावे, जनतेच्या प्रश्नावर चर्चा करावे असे काहीही दिसत नाही. म्हणून हे ऑपरेशन ते ऑपरेशन… आमची ऑपरेशन करता करता तुमचे कधी ऑपरेशन होईल कळणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
तेवढ्या पुरती कटुता दूर ठेऊन…
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडील एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल तर आपली संस्कृती आहे की तेवढ्या पुरती कटुता दूर ठेऊन आपण त्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि निघून जातो. विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले, आम्हीही गेलो, शरद पवारही जातात. हे तेवढ्यापुरते असते. बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही.
भाजप बरोबरचा संघर्ष आम्ही सुरू केलेला नाही
भाजप-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राजकीय दृष्ट्या जवळ येत आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, भाजप बरोबरचा संघर्ष आम्ही सुरू केलेला नाही. हा संघर्ष त्यांनी 2014 पासून सुरू केला आहे. जसे इराणवर अमेरिकेने युद्ध लादले आणि इराण लढतंय, आणि अमेरिका-इस्रायलला माघार घ्यावी लागतेय. आम्ही त्या भूमिकेत आहोत.
दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवणे ही तात्पुरती मलमपट्टी
दरम्यान, साताऱ्यात झालेल्या राड्यानंतर एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ही एक तात्पुरती मलमपट्टी असून देवेंद्र फडणवीस यांना जे साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले आहे. पालकमंत्र्याला बदलले, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली. आता त्यांचे समाधान करायला त्यांना रजेवर पाठवले.




























































