मराठी माणसाला पटकून मारणं मोदी-शहांचे बूट चाटण्याइतकं सोपं नाही, नादाला लागू नका! संजय राऊत कडाडले

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा घोर अपमान केला. ‘महाराष्ट्रात एकही उद्योग नाही. मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय, असे तारे निशिकांत दुबे यांनी तोडले. मराठी माणसाला आपटून आपटून मारू, अशी धमकीही त्यांनी दिली. याला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले असून मराठी माणसाला पटकून मारणे मोदी-शहांचे बूट चाटण्याइतकं सोपं नाही, नादाला लागू नका! असा खणखणीत इशाराही दिला. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी दुबे यांच्या विधानावर मौन बाळगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही चपराक दिली.

महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दात भाजपच्या खासदाराने विधान केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा हा खास माणूस आहे. त्याचा किती लोकांनी निषेध केला? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाला केला.

ते पुढे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात कोणत्याही हिंदी भाषिकावर आम्ही हल्ला केलेला नाही हे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने सांगायला पाहिजे. कोणत्याही हिंदी भाषिकाविषयी आम्ही अपशब्द वापरलेला नाही. हा माणूस दिल्ली विद्यापीठाची फेक डिग्री घेऊन संसदेत बसला आहे. म्हणजे जसा गुरु तसा चेला, असा टोलाही संजय राऊत यांनी मोदींचे नाव न घेता लगावला. दुबेला काय माहिती आहे? म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू. हे उद्योगपतींची दलाली करून कमीनशनखोरी करण्याएवढे किंवा मोदी शहांचे बूट चाटण्याइतके सोपे नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.

फेक डिग्री असलेला माणूस महाराष्ट्राला धडे देतोय आणि या राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सरकार तोंडात बोळा घालून बसले आहेत. डुप्लीकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या गप्पा मारतात, मग आता लाज वाटत नाही का? असा सवाल राऊत यांनी मिंध्यांना केला. ते पुढे म्हणाले की, हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचे पोट भरतो. सगळ्या प्रांताचे लोक मुंबई, महाराष्ट्रात राहतात. आम्ही त्यांना त्यांची जात, प्रांत, धर्म कधी विचारला नाही. कोरोना काळात गंगेत बेवारसरणे प्रेत तरंगत होते आणि इथे उद्धव ठाकरे यांचे सरकार अख्ख्या देशाला खाऊ पिऊ घालत होते, उपचार करत होते. त्यामुळे दुबेला म्हणा, नादाला लागू नको. हे सरकार ऑपरेशन सिंदूरमधील चार अतिरेकी शोधू शकले नाहीत. हिंमत असेल तर मोदींना सांगा त्यांना शोधा आणि मग आमच्या अंगावर या, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

मुख्यमंत्री नक्की मराठीच आहे की त्यांच्या अंगात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय? संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मला आश्चर्य वाटते की भाजपच्या एकाही मंत्र्याने दुबेचा निषेध केला नाही. मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्यांनी यापुढे मराठी भाषेत संवादच साधू नये. ते जर खरे मर्द मराठा असतील तर दुबेचा बंदोबस्त करतील. पण या राज्याला नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि त्या अर्ध्या दाढीवाल्या डीसीएमला लाज वाटली पाहिजे शिवसेनेचे नाव घ्यायला आणि बाळासाहेबांचा फोटो मागे लावायला. तुमच्या पक्षाचा, मोदी-शहांच्या पक्षाचा माणूस महाराष्ट्राविषयी काय बोलतोय याची लाज फडणवीस, शिंदेंना वाटत नाही आणि ते महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उबवायला बसले आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतो, खातो. तुझ्या बापाचे खात नाही. नादी लागू नको, असा इशारा राऊत यांनी दिला. तसेच मुंबईतील हिंदी भाषिकांमध्ये अस्थिरता निर्माण करायची, फूट पाडायची आणि महानगर पालिका निवडणुका घ्यायच्या अशा प्रकारचे राजकारण आहे. त्यासाठी अशा दलालांना पुढे केले आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

अटलजी आणि आडवाणींच्या भाजपची ‘रुदालीं’नी हत्या केलीय! उद्धव ठाकरे यांचा हल्ला