इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? पोस्टरबाजीवरून संजय राऊत यांचा भाजप, शिंदे गटावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी त्यांचे मुंबईत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत येणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटाने पोस्टरबाजी केली आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप, शिंदे गटावर हल्ला चढवला. इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. मंगळवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हे सरकार आणि भाजप, शिंदे गट वेड्यांची जत्रा आहे. अख्खी मुंबई फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजीने रंगवून ठेवली आहे. त्यांना ठाण्यात किंवा मुंबईत स्वीकृत नगरसेवक करायचे आहे का? परदेशी नेते, पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष देशात येतात आणि जातात. यात राजकीय पक्षांचा काय संबंध? असा सवाल राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, मला कुणीतरी सांगितले की अख्खी मुंबई भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी इमॅन्युएल मॅक्रॉनच्या स्वागतासाठी रंगवून ठेवली आहे. सगळीकडे पोस्टरबाजी केलेली आहे. बहुतक इमॅन्युएल मॅक्रॉन त्याच्या निवडणूक प्रचारासाठी आता शिंदे, साटम या लोकांना बोलवेल. फ्रान्समध्ये त्यांचे एवढे पोस्टर लागले नसतील, तेवढे मुंबईत लागलेले आहेत. ही वेड्यांची जत्रा आहे.

अख्ख्या मुंबईचे ट्राफिक जाम करून ठेवले आहे. मला आता कोर्टात जायचे आहे, पण त्यासाठी चार तास लागतील सांगितले, का तर इमॅन्युएल मॅक्रॉन येणार आहेत. यापूर्वी परदेशी पाहुणे मुंबईत आले नाही का? पण इमॅन्युएल मॅक्रॉनपेक्षा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शो असेल. ते आता गाडीतून दाखतील… ‘सी मिस्टर इमॅन्युएल मॅक्रॉन, यू आर ऑफ फोटोज, माय पार्टी हॅज डन धीज. आलीया भोगासी… काय करणार, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात आज मुंबईत द्विपक्षीय चर्चा

मुंबईत पोस्टर लावण्यावरून भाजप, शिंदे गटामध्ये स्पर्धा सुरू आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, कदाचित इमॅन्युएल मॅक्रॉनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची स्पर्धा भविष्यात सुरू होईल. आमचा एक माणूस फ्रान्समध्ये उपमुख्यमंत्री करा असे ते म्हणतील. हे सरकार आणि पक्ष येड्यांची जत्रा आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन सुद्धा हसेल आज. बायकोला फोन करून सांगेल, असेही संजय राऊत म्हणाले.