जो देईल पेजेला त्याच्या शेजेला; मीरा-भाईंदरमध्ये भाजपची एमआयएम, तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती, संजय राऊत यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षा दुतोंडी गांडूळ आहे. आम्हाला ज्ञान देणाऱ्या भाजपने मीरा-भाईंदरमध्ये एमआयएमचा पाठिंबा घेतला आहे. म्हणजे मीरा भाईंदरमध्ये फडणवीस-ओवैसी भाई-भाई, तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे झाले नाहीत का? असा खणखणीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.

मुस्लिम मतांसाठी भाजपने एमआयएमचा थेट पाठिंबा घेतला आहे. एमआयएम आमच्या आसपासही फिरकत नाही, आम्हीही त्यांच्या आसपास फिरकत नाही. पण अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची एमआयएमबरोबर छुपी युती आहे. काही ठिकाणी उघड युती आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असून भाजपच्या दुतोंडीपणाची मोठी गंमत आहे. मीरा-भाईंदरमध्ये ओवैसी, तर अंबरनाथमध्ये काँग्रेसोबत जी चुंबाचुंबी चालली आहे तर हे हिरवे नाही झाले का? भाजपमध्ये दुतोंडी गांडूळ आहे, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

ते पुढे म्हणाले की, मला भाजपचे आश्चर्य वाटत आहे. मोदींना काँग्रेसमुक्त भारत करायचे होते. पण महाराष्ट्रात चित्र वेगळे आहे. अर्धी काँग्रेस त्यांनी भाजपात सामील करून घेतली आणि उरलेल्या ठिकाणी युती करत आहे. एमआयएमसोबत भाजपने मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर युती केल्याचे मला माहिती नाही. पण महाराष्ट्रात ‘नवा पॅटर्न’ आहे.

भाजपला कुणीही चालते. भाजप कामाठीपुरात धंदा करायला उभी आहे. कुणीही या, जो पेजेला देईल, त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे. सध्या दोघे जण शेजेवर चढले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस. ‘जो देईल पेजेला त्याच्या शेजेला’ माझा डायलॉग नसून जयवंत दळवी यांचे नाटक ‘गुंतता हृदय’मधील हे वाक्य आहे. भाजप सध्या याच भूमिकेत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शिंदेंना कमळाबाईचा धक्का, अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस युती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, दोन धुरंधर एकत्र आलेत. मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आम्ही त्याला महाराष्ट्राची मुलाखत म्हणतो. कारण महाराष्ट्राला जे प्रश्न पडले आहेत आणि ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, भाजपने निवडणूक आयोगात, न्याय व्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात जे अधिकारी नेमलेले आहेत ते मराठीच आहेत. मराठी माणसाच्या हातून मराठी माणासाचे ‘डेथ वॉरंट’ काढलं आहे. डेथ वॉरंटवर सही ते मराठी माणसाचे घेत आहेत, हे भाजपचे कसब आहे.

राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरत आहेत. भाजपला शिव्या घालून राज्यभर फिरणारेही अजित पवारही सरकारमध्ये आहेत. त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी सावकरांवरून ज्ञान दिले आहे. सावरकर विरोधी आहेत, तर सरकारमध्ये ठेवता कशाला? आम्हाला सावरकरांचे विचार सोडले म्हणता, मग सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता आपले मंत्री घेऊन तुमच्या सरकारमध्ये बसलेला आहे आणि तुम्ही त्यांना पोकळ सल्ले देत आहेत. सावरकरांचे विचार मानावे लागेल म्हणतात, नाही मानत तर सरकारमधून दूर करा, असेही राऊत म्हणाले.