शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे ध्वजारोहण झाले, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. मोदी ज्या पक्षाचे किंवा विचारधारेचे नेतृत्व करतात त्या विचारधारेत तिरंग्याला स्थानच नाही. ते तिरंगा राष्ट्रीय ध्वज मानायला तयार नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 56 वर्ष ज्यांनी तिरंगा फडकवला नाही अशा विचारधारेचे नेतृत्व मोदी करतात. पण पंतप्रधान म्हणून त्यांना आज तिरंगा फडकवावा लागला, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षातील लाल किल्ल्यावरील सोहळा आणि आजचा सोहळा यात फरक आहे हे मोदींना कळाले असेलच. कारण आज अल्पमतातल्या, बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. देशाचे स्वातंत्र्य गेल्या 10 वर्षापासून गुदमरलेल्या अवस्थेत असून विरोधक, जनतेची सातत्याने गळचेपी होत आहे. स्वातंत्र्याची गळचेपी करणारे, एकप्रकारे सेन्सॉरशीप लादणारे ब्रॉडकास्ट बील सरकारला मागे घ्यावे लागले. विरोधी पक्ष मजबुतीने उभा असल्याने हे बील रद्द करावे लागले. वक्फ बोर्डाचे बीलही तात्पुरते मागे घ्यावे लागले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनता जागरूक आहे. प्रसंगाला बलिदानालाही सज्ज आहे. पण देश 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना पुन्हा एकदा जम्मू-कश्मीरमध्ये जवानांचे बलिदान झाले याचे वाईट वाटते. अतिरेक्यांनी हल्ला केला आणि यात कॅप्टनसह काही जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. गेल्या 10 वर्षांत मोठ्या वल्गना आणि गर्जना करणारे पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार जवानांचे बलिदान रोखू शकले नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी ‘सेक्युलर सिविल कोड’ आणि ‘वन नेशन वन इलेक्शन’ याचा उल्लेख केला. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, मोदींकडे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारे नाही. मोदी सरकारने कलम 370 हटवून त्याचे राजकारण केले, मतं मागितली. हे कलम काढल्यावर शिवसेनेने लोकसभा आणि राज्यसभेत पाठींबा दिला. पण हे कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरच्या परिस्थितीत काय सुधारणार झाली हे मोदींनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवे होते.
पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू-कश्मीरमध्ये जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते. हे कलम हटवल्याने जम्मू-कश्मीरमध्ये काय बदल झाला? असा सवाल करत राऊत म्हणाले की, येथे लोकशाही मार्गाने अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. विधानसभेला टाळे लागलेले आहे. अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. तरुणांना रोजगार नाही. अमरनाथ, वैष्णोदेवीची यात्रा सुरक्षित नाही. सामान्य नागरिक आजही भयभीत आहे. हे कलम हटवून राजकारण करून भाजपला फायदा झाला, पण देशाला काय फायदा झाला? असा सवालही राऊत यांनी केला. तसेच शिवसेनेने हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर… जसे अयोध्येतील राम मंदिराला पाठींबा दिला, तसा 370 कलम हटवण्यालाही पाठींबा दिला होता, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.