न्याय मागण्यासाठी नटीच हवी का? शिवसेनेचा हल्ला

‘उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका गरीब दलित मुलीची सामुहिक बलात्कारानंतर अमानुष हत्या झाली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा कुटुंबाचा अधिकारही हिरावला गेला. एका अभिनेत्रीचे बेकायदा बांधकाम पाडल्यानंतर थयथयाट करणारी मीडिया आणि दलित नेते आता गेले कुठे? ते आता गप्प का?’ असा संतप्त सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना हाथरसमधील घटनेचा ‘धक्कादायक आणि दुदैकी’ असा उल्लेख केला. ‘हाथरसमधील त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मिडियावर मोहीम सुरू झाल्याचे मला दिसले नाही. सेलिब्रिटी किंवा एखाद्या अभिनेत्रीसाठीच न्याय मागितला
जातो का?’ असेही ते म्हणाले.

एकेकाळी आक्रमक असलेल्या दलित चळवळीचे तेज कमी झाले हे दुर्दैव आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे एका अभिनेत्रीसाठी न्याय मागतात पण हाथरसमधील त्या गरीब मुलीसाठी न्याय मागत नाहीत अशी खंत व्यक्त करतानाच संजय राऊत यांनी ‘एका अभिनेत्रीसाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे गेले?’ असाही सवाल केला. हाथरस घटनेबद्दल शिवसेनेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या