बारामतीला जाताना ‘ती’ फाईल अजित पवारांकडेच होती आणि… संजय राऊत यांचे संसदेत तडाखेबंद भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संसदेत तडाखेबंद भाषण करत सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्युवर देखील संशय व्यक्त केला.

”राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर जी चर्चा सुरू आहे. भाषण जर आपण वाचलं, ऐकलं तर आपल्याला वाटेल की देशाची परिस्थिती ठीक नाही. पण आपल्यासमोर जे महान देशभक्त मंडळी बसले आहेत त्यांना वाटतं की देशाची स्थिती चांगली आहे. राष्ट्रपती ज्या सर्वोच्च  सांविधानिक प्रमुख पदावर बसलेल्या राष्ट्रपती त्यांच्या भाषणात प्रत्येक पॅरात बोलतात माझे सरकार माझे सरकार बोलत होते. ज्यांना ते माझे सरकार बोलतात ते सरकार पाखंड आणि बेजबाबदार आहे. जे सरकार प्रत्येक राज्यात गैरसंविधानिकरित्या सत्तेत आले आहे. अशा सरकार राष्ट्रपती माझे सरकार बोलतात”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

”देशात लोकशाही कुठे राहिली आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सरकारच्या हातातील बाहुल्या बनल्या आहेत. कुठे न्याय मिळतो. निवडणूक आयोग भाजपचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली आहे. तुम्ही देशभक्त आहात ना? मग सांगा सोनम वांगचूक कुठे आहेत. ते जिवंत आहेत की नाही हे देखील माहित नाही. चीनने आपली जागा बळकावली हे सांगितलं म्हणून त्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले आहे. ही लोकशाहीची व्याख्या आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

राष्ट्रपतीच्या भाषणात तेच तेच होते. गरिबांना सर्वाधिक रोजगार देणाऱ्या मनरेगाचे नाव तुम्ही बदलले. पण रोजगाराची हमी पण तुम्ही कमी केली. आमच्या मराठवाड्यात 2025 मध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाऱ्यांनी भरलेली आहे. आज मला अजित पवारांची आठवण येतेय. आमच्या महाराष्ट्राचे मोठे नेते होते. अत्यंत दुर्दैवीपणे त्यांचा मृत्यू झाला. आम्ही आजही त्या धक्क्यात आहोत. अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. 15 जानेवारीला अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं. भाजप जर सिंचन घोटाळ्याचा आऱोप करता तर भाजपने देखील या घोटाळ्यात भरपूर पैसा खाल्ला होता. त्याची फाईल माझ्याकडे आहे ,असे ते म्हणाले होते. त्यानंतर दहा दिवसातच अजित पवार यांचा मृत्यू होतो. माझ्या माहितीनुसार अजित पवार ती फाईल स्वत:जवळ ठेवायचे. मुंबईवरून बारामतीला निघाले तेव्हा देखील ती फाईल त्यांच्याकडे होती. त्यानंतर अर्ध्या तासातच हा अपघात झाला. या अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी एक विशेष न्यायालयीन समिती स्थापन करायला हवी. मला हे सर्व पाहून जस्टिस लोया आठवले, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तुमचे सरकार लोकशाही पद्धतीने आले आहे. भाजपवाले हिंदुत्वाची गोष्ट करतात पण आपल्या देशात हिंदू घाणेरडे पाणी पिऊन मरतोय, हिंदू कफ सिरप पिऊन मरतोय त्याचा जर आदरणीय राष्ट्रपतींनी उल्लेख केला असता तर आम्ही त्यांच्या भाषणाचे स्वागत केले असते.