
”भाजपच्या काळात कुणाला कधी अटक होईल ते सांगता येत नाही. एकनाथ खडसे गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तुटून पडले आहेत. त्यामुळेच आज त्यांच्या कुटुंबावर धाड टाकली आहे. पोलीस व पोलिसांची यंत्रणा ही भाजप विरोधींना त्रास देण्यासाठीच आहे”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल याला पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजप व गिरीश महाजनांवर निशाणा साधला. ”या सरकारच्या काळात कधी कुणाला अटक होईल, कधी कुणावर गोळीबार होईल हे सांगता येत नाही. सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक होऊ शकते. पोलीस व पोलिसांची यंत्रणा ही भाजप विरोधांना त्रास देण्यासाठीच आहेत. दोन दिवसांपासून एकनाथ खडसे सरकारविरोधात व खासकरून गिरीश महाजन यांच्याविरोधात ठामपणे बोलत आहेत, पुराव्यांसह बोलत आहेत. त्यानंतर पुढल्या चोवीस तासात त्यांच्या जावयाविरोधात ही कारवाई झाली. एकनाथ खडसेंच्या आरोपांची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्यांच्या घरावर धाडी टाकली जाते. ही पार्टी, ती पार्टी. अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
”नाशिक मध्ये शिवसेनेच्या लोकांचा मिस्टर महाजन भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेत आहेत. भाजपवाल्यांनी आधी त्यांच्यावर आरोप केले. आता त्यांना दबाव टाकून त्यांना भाजपात यायला सांगितले व भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले. आमचे बडगुजर होते त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले. ते भाजपात गेले त्यानंतर सगळे गुन्हे रफादफा झाले, असे संजय राऊत म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात पुरावे नक्की देणार
”श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात पुरावे नक्की देणार. आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते भ्रष्टाचार कसा झाला ते सांगतात. मी एकनाथ खडसे, अंजली दमानिया हे भ्रष्टाचाराची माहिती देतात. पुरावे शोधण्याचं काम तपास यंत्रणांचं असतं. पोलीस कशा करता आहेत, तुमची भांडी घासायला का? ईडी, अँटी करप्शन ब्युरो ही तुमच्या घरची धुणी भांडी करायला आहे का? त्यांचं काम विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटका करून खोट्या कारवाया करण्याचे आहे का? या भ्रष्टाचाऱ्यांना टाका ना टायरमध्ये. अमित साळुखेंना झारखंडचे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आता ते चौकशी करतील. ते काही भाजपचे पोलीस नाहीत. त्यामुळे आता सर्व पुरावे येतील. सर्व पैसे कुठल्या मेडिकल फाऊंडेशन ला गेले, स्पेनने चार्टड फ्लाईटने कोण कुणाला घेऊन गेलं. त्या चार्टड फ्लाईटमध्ये आठ तासात कोणती पार्टी झाली ते श्रीकांत शिंदेना सांगावं लागेल. चार्टड फ्लाईटने अमित साळुखेंने कुणाला नेलं, अमित साळुंखेने हा खर्च कुणी केला. सगळे पुरावे मिळतील. मिस्टर श्रीकांत शिंदे थोडा धीर धरा, असे संजय राऊत म्हणाले.