महिलांवरील अत्याचार रोखण्यात मिंधे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय आहेत. महाराष्ट्राचे वाटोळे करणार्या अशा सरकारला खुर्चीवरून खाली खेचण्याची वेळ आता आली असल्याचा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री हा संशयी आत्मा असून त्यांचा अर्धा दिवस जादूटोणा, मंत्रतंत्र करण्यात जातो, असा आरोपही राऊत यांनी केला.
जळगाव जिल्ह्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पाचोरा, चाळीसगाव तसेच पारोळा येथे शिवसेना पदाधिकार्यांच्या बैठका तसेच जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी मिंधे सरकारची लक्तरेच काढली. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून ते रोखण्यात मिंधे सरकार, गृहखात्याला अपयश आले आहे. फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्राचे वाटोळे करणार्या या मिंधे सरकारच्या बुडाखालची खुर्ची खेचण्याची वेळ आली आहे. जनताच या घटनाबाह्य सरकारचा निकाल लावेल, असा आत्मविश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. मोदी, शहा या दोन गुजराती व्यापार्यांनी देशाची वाट लावली असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख सुनील पाटील, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महिला आघाडीच्या वैशाली सूर्यवंशी, माजी खासदार उन्मेष पाटील, करण पवार आदींची उपस्थिती होती.
जळगावच्या दलालाला महिलांनी हाकलला
बदलापूरच्या आंदोलनात शिष्टाई करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजनांना संतप्त महिलांनी हाकलून दिले. मुख्यमंत्र्यांचा दिवसातला अर्धा वेळ मंत्रतंत्र, जादूटोणा यात जातो. बदलापुरातील आंदोलनही मुख्यमंत्र्यांना जादूटोणा वाटला असेल. मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या लोकसभा मतदारसंघात प्रचंड आक्रोश आहे. ठाणे हा त्यांचा जिल्हा आहे. पण मुख्यमंत्री वा त्यांचा मुलगा आंदोलकांच्या भेटीला गेले नाहीत. असा भयग्रस्त मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राने पाहिला नव्हता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोणत्या कारागृहात फाशी दिली?
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात अशीच अत्याचाराची घटना घडली होती. ते प्रकरण सरकारने फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले आणि दोन महिन्यांपूर्वी आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात. कोणत्या न्यायालयात हा खटला चालला? कोणत्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली? कोणत्या कारागृहात फाशीची अंमलबजावणी करण्यात आली? राजभवनात या फाशीची नोंद करण्यात आली का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊन परस्पर कोणाला फाशी देण्यात आली याची चौकशी करावी अशी मागणी केली.
तात्यासाहेब म्हणजे निष्ठेचे दुसरे रूप
पाचोरा येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी तात्यासाहेब पाटील यांच्या आठवणी जागवल्या. तात्यासाहेब म्हणजे निष्ठेचे दुसरे रूप असल्याचे ते म्हणाले. याच पाचोर्यात तात्यासाहेबांच्या निष्ठेला कलंक लागला. हा कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे आणि त्यासाठी वैशाली सूर्यवंशी यांना आगामी विधानसभेत निवडून द्यायचे आहे असे आवाहनी यावेळी खासदार राऊत यांनी केले.