शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. गुरुवारी सायंकाळी ते मुंबईत परतले. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील घटनाबाह्य खोके सरकार आणि मोदी सरकारवरही आसूड ओढला.
दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होती. लोकसभेचे निकाल चांगलेले लागलेले असून त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांशी आणि खासदारांशी त्यांची भेट झाली. तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुकांना सोमारे जात असून तिन्ही पक्षांमध्ये प्रेमाचे, संवादाचे वातावरण आहे. जागावाटप किंवा अन्य गोष्टीतही आमच्यात मतभेद नसून सर्वकाही सुरळीत चालले आहे, असे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीचा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत मेळावा आहे. भविष्यात निवडणुकीच्याआधी राहुल गांधीही महाराष्ट्रात येऊ शकतात. उद्धव ठाकरे हे दौऱ्यावर जात असून शरद पवारही राज्यभर फिरताहेत. महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय असून निवडणुकीला सामोरे जाताना हाताता घालून गेले पाहिजे. कोणतीही मतभिन्नता असा कामा नये. कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला ही भूमिका असता कामा नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे आणि फार ओढाताण करायची नाही ठरले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये खोके सरकार घालवायचे आहे, असा शंखनादही राऊत यांनी केला.
महाराष्ट्राला लुटणाऱ्या घटनाबाह्य खोके सरकारला घालवायचे आहे. शेख हसीनासारखं पळवून पळवून नाही तर लोकशाही पद्धतीने घालवायचे आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचे आहे. महाराष्ट्रात जे घाणेरडे राजकारण झाले आहे. पैशाचे असेल किंवा विषारी राजकारण असेल त्याचे सुत्रधार देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शहा आहेत, असा घणाघातही राऊत यांनी केले.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख चेहरा आहेत का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, या निर्णयाबाबत तुम्हाला भविष्यात कळेल. महाविकास आघाडी म्हटल्यावर आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो. महाविकास आघाडीत आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आम्ही वारंवार सांगतो की लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा असता तर अनेक जागांवर भाजपचा पराभव झाला असता, असेही राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्याने विरोधकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षालाही चेहरा असावा लागतो. इंडिया आघाडीचा देशातला चेहरा राहुल गांधी हेच आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले नसते, तर विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता अन् आत्मविश्वासही डळमळीत झाला असता. देशामध्ये मोदी व शहांच्या अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हते, तेव्हा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला आणि राष्ट्रीत स्तरावर विरोधी पक्षाचे चेहरे बनले, असेही राऊत म्हणाले.