छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. इंग्रजांविरोधात बंड पुकारताना महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला होता. आता महायुती सरकारविरोधात ‘चले जाव’चा नारा द्यावा लागणार आहे, असे आवाहन करत मोदी सरकारला गांधी नावाची भीती वाटते, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधीशांना सुनावले आहे. मुंबईत ‘भारत छोडो’ आंदोलनाला 82 वर्ष पूर्ण झाली यानिमित्त तेजपाल हॉल इथे आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते.
पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून महायुती सरकारला मते मिळत नाही म्हणून हे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे पुढचे दोन अडीच महिने दक्ष राहून या प्रवृत्तीविरोधात लढावे लागेल. महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’ असा नारा दिला. इंग्रजांचे सोबती आता सत्तेत आहेत आणि तेच आता देशभक्ती सांगत आहेत. महायुतीने महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवली आहे. त्यामुळे महायुतीचा हिशोब चुकता करावा लागेल. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असे वडेट्टीवार ठामपणे म्हणाले.
‘खोके’ सरकारला शेख हसीनासारखं पळवून पळवून नाही तर लोकशाही मार्गाने घालवायचंय; संजय राऊत यांचा शंखनाद
ते पुढे म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी राहुलजी गांधी यांची सत्ताधीशांना भीती वाटते. राहुल गांधी या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत. ही लढाई आपल्याला पुढे न्यावी लागणार आहे. आता महाराष्ट्राच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. पुढची लढाई ‘करो किंवा मरो’ ची आहे. महाराष्ट्र वाचविण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. मोदी सरकारला गांधी नावाची भीती वाटते, असेही ते म्हणाले.