शिवसेना गोव्यात 25 जागा लढवणार, खासदार संजय राऊत यांची माहिती

गोव्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

गोव्यात पुढील वर्षी मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत गोवा दौऱयावर असून त्यांनी काल आणि आज पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱयांच्या बैठका घेऊन निवडणूक रणनीतीवर चर्चा केली. पणजी येथील शिवसेना मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त करतानाच शिवसेना यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली.

खासदार राऊत म्हणाले, गेल्या वेळी आम्ही मगो आणि गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. युतीमध्ये फक्त तीन जागा आम्हाला मिळाल्या होत्या. युती झाली की, मर्यादा येतात. त्यामुळे पक्ष विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याने यावेळी आम्ही स्वबळावर 25 जागा लढवण्याचे ठरवले आहे. 10 ते 15 ठिकाणी आमचे उमेदवार ठरले असून इतर उमेदवारांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

यावेळी शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, गोवा संपर्कप्रमुख जीवन कामत, उपाध्यक्ष राखी नाईक, सरचिटणीस मिलिंद गावस, दक्षिण गोवा जिल्हाप्रमुख अलेक्सी फर्नांडिस उपस्थित होते.

जनता आमदारांच्या घोडेबाजाराला कंटाळली

युतीवेळी आपली ताकद जास्त आहे असे सांगून ज्यांनी जास्त जागा लढवल्या होत्या त्यांची अवस्था काय झाली होती, हे सगळे जाणून आहेत याची आठवण करून देत खासदार राऊत म्हणाले, गोव्यातील जनता आमदारांच्या घोडेबाजाराला कंटाळली आहे. एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी एका रात्रीत पक्ष बदलतात. अशा आमदारांना लोकांनी रस्त्यावर गाठून ठोकले पाहिजे. शिवसेना असल्या गलिच्छ राजकारणाला थारा देणार नाही. गोव्यातील जनतेने आतापर्यंत इतर पक्षांना संधी देऊन पाहिले आहे. यावेळी शिवसेनेला संधी द्या. आम्ही चांगले सरकार निश्चित देऊ.

निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता खासदार राऊत म्हणाले, गोव्यातील विरोधी पक्षातले नेते मुंबई आणि दिल्लीमध्ये येऊन अनेकदा भेटत असतात. मात्र अद्याप तरी आघाडी किंवा महाआघाडी करून निवडणूक लढवण्याचा कोणाचाच प्रस्ताव नाही.

आपली प्रतिक्रिया द्या