विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबली? याचिका दाखल करणार! संजय राऊत यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आयएनएस विक्रांत’ वाचविण्यासाठी ज्या चोराने म्हणजे किरीट सोमय्याने लाखो रुपये गोळा केले. ते पैसे राजभवनात जमा करू, असे सांगितले होते. मात्र, जमा केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे ते अजुनही समजले नाही. सरकार बदलताच चौकशी थांबवून या चोरांना क्लीन चीट देण्यात आली. अशा पद्धतीने गेल्या सहा महिन्यांत सरकारने 28 चोरांना ‘इओडब्ल्यू’च्या माध्यमातून क्लीन चीट दिली. या घोटाळ्याबाबत आता पुन्हा याचिका दाखल करणार आहे, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

किरीट सोमय्याने प्रथम कोट्यवधी रुपये कुठे ठेवलेत, हे स्पष्ट करावे मग इतरांवर बोलावे. विरोधात असणाऱ्यांना तुरुंगात टाकायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचे सुरू असले तरी येत्या 2024ला याचा सर्व हिशोब केला जाईल हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

योगी आदित्यनाथ, गुजरात सरकारवर आधी गुन्हा दाखल करावा

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह सर्व कोविड सेंटर आणि प्रत्येक आरोग्य सुविधा त्या काळातील उत्तम रित्या चालवले गेले.त्या संदर्भात मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चौहान यांनी स्वतः सांगितले. तरीही चांगले काम करणाऱ्याला त्रास द्यायचा. याकरिता केंद्रात ईडी, सीबीआय आणि राज्यात इडब्ल्यू आणि पोलीस यांचा वापर केला जात असल्याचे संजय राऊत म्हणाले.

कोविड काळात अनुभव नसणाऱ्यांना टेंडर देत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात असल्याकडे पत्रकारांनी विचारले असता, यामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. हे सर्व खोटे प्रकरण असल्याचे संजय राऊत यांनी निक्षून सांगितले. सर्वात जास्त मृत्यू हे योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात झाले. गंगेत प्रेतं वाहुन जात होती. गुजरातमध्येही स्मशानभूमीत प्रेताच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सर्वात आधी सोमय्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. हे इतके भंपक, खोटारडे लोक असून, महाराष्ट्र बुडवण्यासाठी परप्रांतातून येथे आले आहेत. त्यांना मराठी माणसांविषयी कमालीचा द्वेष आहे. महाराष्ट्र लुटून दुसऱ्या राज्यात न्यायचा आहे, याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधले.

पालघरचे साधू हत्याकांड आणि कणेरी मठातील गाईंचं हत्याकांड हे समानच!

कणेरी मठ येथे 52 गाईंचा आकस्मिक मृत्यूचा प्रकार झाला. हेच जर दुसऱ्या राज्यात घडले असते, तर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला असता. मुख्यमंत्री आणि अनेक भाजपचे कार्यकर्ते येथे आले. त्या गाईंना चारा घातला आणि दुसऱ्या दिवशी गाईंचा मृत्यू होतो. रेडा बळीप्रमाणे हा कोणता बळी आहे का हे पहावा लागेल. आम्ही गाईंना श्रद्धांजली वाहिली. विधिमंडळातदेखील आमचे आमदार श्रद्धांजली वाहतील. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरदेखील याबाबत मोठा दबाव असल्याचे दिसून येत आहे. दबावाचे राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकते. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. तसेच पालघर येथे झालेले साधूंचे हत्याकांड आणि कणेरी मठातील गाईंचे हत्याकांड हे आपल्या दृष्टीने एक समान असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

हा भाजपचा पराभव

कसबा आणि चिंचवडच्या निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याचे दिसून आले, तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणांचा वापर केला. यंत्रणा अशा हाताशी घेऊन राज्य करणार असतील तर हे राज्य मोडून पडेल, अशी भीती व्यक्त करतानाच आम्ही तुमच्या अशा कारवायांना घाबरत नसल्याचेही संजय राऊत यांनी ठणकावले. दरम्यान, पोटनिवडणुकीबाबत एक्झिट पोल बाहेर आले असून, कसब्याची जागा महाविकास आघाडीकडे येणार असली तरी चिंचवडची जागा मात्र त्यांच्या हातातून जाण्याचा कल असल्याचे दिसत आहे. कसब्याची जागा गेली 30-35 वर्षे भाजपकडे आहे. ती भाजपच्या हातातून जात असल्याची खरी माहिती आहे. शिवाय चिंचवडची जागा कोण जिंकेल, हे भाजपला सांगता येत नाही, हा भाजपचा पराभव असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

संजय राऊत यांनी घेतली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची सदिच्छा भेट घेतली आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाराजांना भेटणे हा आनंददायी क्षण आहे. ते वडीलधारी आहेत, प्रेमळ आहेत. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत जवळचे कौटुंबिक संबंध आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या 75व्या वाढदिवसादिनी आपण बाहेर होतो. आज कोल्हापूरला आल्यानंतर महाराजांना भेटून शुभेच्छा दिल्या. शिवसेना सध्या संघर्षाच्या काळात आहे. यांसह देशातील विविध समस्या आणि विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.