
महायुती सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाचे मंत्रीपद मिळूनही शिंदे गटाचे संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावर चिकटून बसले होते. मंत्रीपद मिळाल्यानंतरही सिडकोचे अध्यक्षपद सोडण्यास तयार नसलेले संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे.
राज्य सरकारच्या नियम आणि संकेतानुसार मंत्रीपदी असलेल्या व्यक्तीने महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित आहे, मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागून महिना उलटून गेला तरी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. सिडकोचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याने मंत्री बनल्यावर त्याचा राजीनामा देणे अपेक्षित होते, मात्र सामाजिक न्याय खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरही संजय शिरसाट यांनी राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते. या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने आज संजय शिरसाट यांचा सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणणारा शासन निर्णय जारी केला.




























































