>> संजीव साबडे
सध्या फराळाची चर्चा सुरू झाली असेलच. म्हणजे तोच तो चिवडा, तेच लाडू व करंज्या, त्याच चकल्या आणि शंकरपाळ्या आणि तीच ती शेव असं ठरलेलं. अनेकदा हे बनवण्याचा कंटाळा येतो. घरी येणाऱया पाहुण्यांनाही तेच पदार्थ समोर पाहणं नकोसं होतं. तरीही दिवाळीचा फराळ हवाच. तो चांगला, वेगळा असला तर संपतो. त्यामुळे यंदा दिवाळीत वेगळे पदार्थ सुचवण्याचा हा प्रयत्न. यातील काही करायला सोपे, एखादा अवघड, पण खाताना कौतुक होईल असा. तेव्हा या दिवाळीत वेगळे पदार्थ, वेगळ्या चवी आवर्जून चाखून पहा.
एका आठवडय़ावर दिवाळी आली. आपण जरी हल्ली घर नेहमी स्वच्छ व नीटनेटकं ठेवत असलो तरी दिवाळीच्या आधी घराची साफसफाई केली जातेच. खिडक्याचे पडदे बदलण्यासोबत डबे, भांडी घासून पुसून ठेवायची असतात. मग फराळाचे काय पदार्थ करावेत की विकत आणावेत, बाहेरून आणायचे तर मराठी दुकानं ठरतात. गेल्या वेळी जोशांकडची चकली तुटतच नव्हती, पाटील बाईंकडून घेतलेले बेसनाचे लाडू तोंडात चिकटत होते, अशा चर्चाही झडतात. गेल्या वेळी खूप फराळ झाला. दोन-तीन आठवडे तो संपलाच नाही, अशी पार असते. सर्व प्रकार घरी करण्यापेक्षा अमुक घरी करू, उरलेले विकत आणू, यावर एकमत होतं.
सध्या फराळाची चर्चा सुरू झाली असेलच. म्हणजे तोच तो चिवडा, तेच लाडू व करंज्या, त्याच चकल्या आणि शंकरपाळ्या आणि तीच ती शेव असं ठरलेलं. अनेकदा हे बनवण्याचा कंटाळा येतो. घरी येणाऱया पाहुण्यांनाही तेच पदार्थ समोर पाहणं नकोसं होतं. अख्ख्या चकलीचा तुकडा मोडून व लाडूचा चतकोर भाग तोडून खाताना त्याचा आकार बिघडतो. चिवडय़ातले काजू, शेंगदाणे तोंडात टाकून नुसते पोहे ताटात ठेवणे, हे ठरलेले. फक्त मस्त फक्कड चहा करा, असे सांगून काही जण फराळाकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी राग येतो. दिवाळीत फराळाची ताटे शेजारी-पाजारी जातात. सर्वांच्या ताटात साधारणपणे तेच ते प्रकार असतात. आपल्याकडचं संपेना, आता हे कसं संपवायचं, अशी वाक्यं ऐकू येतात. त्या ताटातला एखादा शेलका पदार्थ संपतो, बाकी सारं तसंच. काहीजण सर्व ताटातील पदार्थ एकत्र करून डब्यात भरतात. वेगवेगळ्या चवीचे चिवडे, चकल्या, शेव एकमेकांत मिसळल्याने एक वेगळीच चव तोंडात तयार होते.
तरीही दिवाळीचा फराळ हवाच. तो चांगला, वेगळा असला तर संपतो. त्यामुळे यंदा दिवाळीत वेगळे पदार्थ सुचवण्याचा हा प्रयत्न. यातील काही करायला सोपे, एखादा अवघड, पण खाताना कौतुक होईल असा. काही पदार्थ तर सहजच विकत मिळणारे. दरवर्षी बऱयाच घरांत कच्च्या पोह्याचा चिवडाच केला जातो. तो चांगला कुरकुरीत झाला नाही तर खायला चांगला लागत नाही. बऱयाचदा विकत आणलेल्या चिवडय़ात साखर फार असते. त्यामुळे तो चिवडा तिखट व खमंग लागतच नाही. त्यामुळे या वर्षी भाजक्या पोह्याचा खमंग व तिखट चिवडा घरात करा. बाजारात लक्ष्मीनारायण, महालक्ष्मी नावाचे चिवडेही जास्त साखरेमुळे गोड होऊ लागले आहेत. त्या चिवडय़ांची मजा कमी होत आहे. त्यातल्या त्यात कोंडाजीचा चिवडा बरा. त्यामुळे चिवडा घरी करायचा किंवा लालबागच्या चिवडा गल्लीत जाऊन आणि वेगवेगळ्या दुकानांत मिळणाऱया चिवडय़ांची चव घेऊन एखादा करण्याचा ठरवायचा. जे नेहमी भाजक्या पोह्याचा चिवडा करतात, त्यांनी वा इतरांनीही बटाटय़ाचा उपवासाचा चिवडा करावा. तो असंख्य ठिकाणी मिळतो, पण खूप गोड. त्याऐवजी नुसता बटाटय़ाचा कीस विकत आणून हवा तसा चिवडाही करता येईल.
काही जण लाडू दाबून त्याचा थोडा भाग खातात. त्यामुळे मोडलेला लाडू कोणासमोर ठेवता येत नाही. त्यामुळे यंदा बेसन किंवा रव्याचे लाडू करायचे नाहीत. त्याऐवजी बेसन व रव्याच्या लहान वडय़ा करून पाहा. लाडूसाठी करता तसं सारं मिश्रण तूप लावलेल्या ताटात पसरल्यानंतर ते थोडय़ा वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवायचं आणि मगच सुरीने हव्या त्या आकाराच्या वडय़ा पाडायच्या. पाहुण्यांसमोर अधिक वडय़ा ठेवा. वाटेल तर जास्त खातील वा एखादीच घेतील, पण त्यांचा चुरा होणार नाही. खजूर आणि सुका मेव्याची बर्फी तुलनेने सोपी आणि खायला मस्त. त्यात साखर वा गूळ घालायचा नाही. म्हणजे शुगर फ्री मिठाई तयार.
केळं आणि गुळाचा केरळी हलवाही करून पाहा. हा चॉकलेटी रंगाचा हलवा लागतो मस्त आणि करायला सोपा. चार केळी बारीक कापून ती मिक्सरमधून काढायची. दुसरीकडे पाण्यात एक कप गूळ उकळत ठेवायचा. नंतर गॅसवर एका भांडय़ात दोन-तीन चमचे तूप ओतायचे. ते गरम झाले की, केळ्याची पेस्ट त्यात घालायची आणि ती चिकटू नये म्हणून झरा किंवा उलथन्याने हलवत राहायचे. त्याचा रंग बदलू लागला की, त्यात गूळपाणी गाळणीतून ओता. त्यामुळे तिला चिकटपणा येऊ लागेल. तसं झालं की, त्यात काजू, बदाम, पिस्त्याचे बारीक काप घाला. आता भांडं खाली काढून गार झालं की एका कंटेनरमध्ये ओता. त्यात वेलदोडा पूड नीट मिसळा. मिश्रण गार झाले की, सुरीने त्याचे लहान तुकडे करा. गुळाऐवजी साखर घातली तरी चालते. या हलव्याचा रंग काहीसा जिलबीसारखा येतो. त्यात केसर वा जिलबीचा रंग घाला हवा तर. केरळी दुकानात हा हलवा मिळतो आणि घरी करायचा असेल तर केळीही मिळतात.
तिखट पदार्थांत चकली तर हवीच. बहुतांशी लोक भाजणीची चकली करतात. या वर्षी मूग आणि मैदा एकत्र करून चकल्या करा. खूप हलक्या आणि खायला अतिशय कुरकुरीत. त्यात तिखट, मीठ, जिरा पूड, ओवा, हिंग हे सारं घाला. काही गोल चकल्या करा आणि थोडय़ा तुकडा चकल्या पण करा. म्हणजे तुकडे उचलून खाता येतात. नुसती चकली कोरडी लागते. सोबत हिरवी चटणी वा सॉस द्या. तसंच यंदा गोड नाही तर खारट शंकरपाळ्या करा. अशा शंकरपाळ्या वा मुगाच्या चकल्या करणं सोपं आहे. त्या विकतही मिळतात.आणखी एक तिखट प्रकारात बाकरवडीचा विचार करा. त्याची मराठी पाककृती तुम्हाला इंटरनेटवर सापडेल किंवा बाजारात असंख्य प्रकारच्या बाकरवडय़ा मिळतातच की.
चिरोटे, अनारसे करणं तितकंसं सोपं नाही. जमतं त्यांनी घरी करावेत, इतरांनी दुकानातून आणावेत. उनिअप्पम हा गोड पदार्थ केरळी दुकानात कायम मिळतो. केळं, गूळ, तांदळाच्या पिठापासून केला जाणारा हा पदार्थ पुढच्या वर्षी घरी करा. यंदा विकत आणून आवडतो का ते पाहा.