कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज रथयात्रा उत्साहात

 ‘धाकटी पंढरी’ अशी ओळख असलेले कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या रथयात्रेसाठी बुधवारी (दि. 31) भाविकांचा जनसागर उसळला होता. सुमारे एक लाख भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. पावसातही रथयात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली.

रथयात्रेसाठी राज्यभरातून भाविक आले होते. बुधवारी सकाळपासून पाऊस सुरू होता, तरीदेखील भर पावसात मंदिराच्या बाहेर रांगा लावून भाविकांनी रात्री बारा वाजल्यापासून दर्शन घेतले. अभिषेक करण्यासाठीदेखील मोठी गर्दी झाली होती. विठुरायाच्या व संत गोदड महाराज यांच्या गजराने कर्जत शहर भक्तिरसात न्हाऊन गेले होते.

ग्रामदैवत गोदड महाराज रथयात्रेच्या निमित्ताने पोलीस विभागाच्या मानाच्या ध्वजाची सवाद्य मिरवणूक कर्जत शहरातून काढण्यात आली. या यात्रेच्या वेळी पोलीस विभागाला मानाच्या ध्वजाचा मान आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन ते गोदड महाराज मंदिर अशी मानाच्या ध्वजाची मिरवणूक काढली. यानंतर मानाचा ध्वज मंदिरामध्ये नेण्यात आला. त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुन्हा ध्वज पोलीस स्टेशनमध्ये परत आला. न्यायाधीश दीपक गिरी व तहसीलदार गुरू बिराजदार यांना पूजेचा मान असल्याने त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

मंदिरामध्ये रात्री बारा वाजता अभिषेक सुरू झाला. यावेळी दर्शनासाठी भाविकांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. यावेळी मानकऱयांसह भाविकांचेही अभिषेक झाले. दुपारी एक वाजता श्री पांडुरंगाचे आगमन होते आणि त्यानंतर रथ जाग्यावरून हलविला जातो. याप्रमाणे दुपारी एक वाजता मानकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पुन्हा रथ ओढण्यास सुरुवात झाली. रथासमोर वारकऱयांच्या दिंडय़ांनी भगव्या पताका हातात घेऊन टाळ-मृदंगांच्या गजरात हरिनामाचा गजर केला.

रथयात्रेनिमित्त संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी फराळ, फळे, पाणी, चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, राम शिंदे उपस्थित होते.

शेकडो वर्षांची परंपरा आजतागायत सुरू

भव्य अशा लाकडी रथामध्ये श्री पांडुरंगाची मूर्ती ठेवून हा रथ ओढण्याची गोदड महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही मोठय़ा उत्साहामध्ये सुरू आहे. विशेषतः रथ ओढण्यासाठी तरुणांची संख्या मोठी असते. रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी भाविक जागोजागी रथ मार्गावर उभे असतात. हा रथ जागोजागी उभा करण्याचे कौशल्य रथाला ओटी लावणारे करत असतात. फळांचे हार आणि नारळाचे तोरण अर्पण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश

गेल्या दोन वर्षांपासून कर्जत शहरामध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाचे काम करणारे स्वच्छतादूत अशी ओळख असणारे सामाजिक संघटनेचे शिलेदार यांनी मंदिराच्या परिसरात येऊन मानकऱयांना रोपे देऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला. तसेच सकाळी प्रदक्षिणेसाठी रथ मंदिरासमोर आणण्याचे कामही या शिलेदारांनी केले.