Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडचे अमेरिका कनेक्शन उघड

वाल्मीक कराड 17 मोबाईल वापरत असल्याची चर्चा असून त्यापैकी तीन मोबाईल एसआयटीने ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर वाल्मीककडे अमेरिकेत नोंदणी केलेले दोन सीम कार्डही एसआयटीला सापडले आहेत. याच सीम कार्डचा वापर निवडणुकीच्या काळात करण्यात आला असावा, असा संशय एसआयटीला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. पवनचक्कीच्या वादातून संतोष देशमुख यांना अतिशय निर्दयतेने मारण्यात आले. या प्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सूर्यवंशी, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे या आठ जणांसह त्यांचे ‘आका’ वाल्मीक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. यापैकी कृष्णा आंधळे हा अजूनही तपास अधिकाऱ्यांना हुलकावणी देत आहे. वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जीवश्च पंठश्च संबंधही यानिमित्ताने समोर आले. वाल्मीक कराडची दहशत, त्याने जमवलेली अफाट संपत्तीही लोकांच्या समोर आली.

सीआयडीचे पथक केजमध्ये तळ ठोपून

वाल्मीक कराडची एसआयटी कोठडीत कसून चौकशी करण्यात येत असतानाच सीआयडीच्या पथकाने केजमध्ये ठाण मांडल्याने आणखी काही जण जाळय़ात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. बुधवारपासून सीआयडीच्या हालचालीही वाढल्या आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाच्या आधारे सीआयडीने चौकशी सुरू केली.

विष्णू चाटे लातूर कारागृहात

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी विष्णू चाटे याला त्याच्या विनंतीवरून लातूर कारागृहात हलवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच विष्णू चाटेने आपल्याला लातूर कारागृहात हलवण्यात यावे, असे पत्र तपास यंत्रणांना दिले होते.

महिनाभरात पंकजा मुंडे या बीडकडे फिरकल्याही नाहीत. बीडमधील परिस्थितीबद्दल विचारले की ‘प्रोटोकॉल’ आहे असे सांगून त्या गप्प बसतात. संतोष देशमुख हा निवडणुकीत पंकजा यांचा बूथप्रमुख होता. केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडणुकीतही त्याने बूथवर काम केले. परंतु या दोघीही महिनाभरापासून गप्पच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंडे वैद्यनाथा चरणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी हे धनंजय मुंडे यांच्याशी निगडित आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी दोन वेळा आपण राजीनामा देणार नाही असे स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर महिनाभरापासून परळीपासून दूर असणारे धनंजय मुंडे बुधवारी रात्री नाथरा येथे डेरेदाखल झाले. परळीत पाऊल ठेवताच त्यांनी वाल्मीक कराडच्या कुटुंबाची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर आज दुपारी 1 वाजता धनंजय मुंडे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला आले. वैद्यनाथाला त्यांनी विधीवत अभिषेक केला. त्यानंतर ते आपल्या ‘जगमित्र’ कार्यालयात आले. तेथे त्यांनी जनता दरबार भरवला.