
वाल्मीक कराड आपल्या गँगसह 29 नोव्हेंबर रोजी केज येथे विष्णू चाटेच्या कार्यालयात आला होता. याच दिवशी मस्साजोग येथे काम करणाऱ्या अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. सीआयडीच्या हाती लागलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत असल्यामुळे खंडणीच्या पुराव्याला बळकटीच मिळाली आहे.
अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला म्हणूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात सर्वात अगोदर विष्णू चाटे हा पोलिसांच्या हाती लागला. सध्या हा विष्णू चाटे लातूरच्या कारागृहाची हवा खात आहे. विष्णू चाटेचे केज शहरात कार्यालय असून तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज सीआयडीच्या हाती लागले आहेत.
29 नोव्हेंबरला म्हणजे ज्या दिवशी अवादा कंपनीला दोन कोटी रुपये खंडणी मागण्यात आली, त्या दिवशी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि निलंबित सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील हे विष्णू चाटेच्या कार्यालयात आले होते. विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच वाल्मीक कराडने अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांना खंडणीसाठी धमकावले होते.