नाट्यनिर्माता संघाच्या अध्यक्षपदी संतोष काणेकर, कार्यकारिणीत पाच महिला सदस्यांचा समावेश

779

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या नव्या कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. निर्माता संघाच्या अध्यक्षपदी संतोष काणेकर यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश महाराव यांची बहुमताने निवड झाली. प्रमुख कार्यवाहपद पुन्हा राहुल भंडारे यांच्याकडे आले आहे.

काही दिवसांपूर्वी मदतनिधी वाटपातील मतभेदामुळे तत्कालीन अध्यक्षांसाह काही सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माता संघाची कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली होती. त्यानंतर आज मुदतपूर्व निवडणूक घेऊन नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निर्माता संघाच्या सहवार्यकाहपदी सुशील आंबेकर, कोषाध्यक्ष दिनू पेडणेकर आणि सहकोषाध्यक्ष देकेंद्र पेम यांची निवड झाली. संजीवनी जाधव, पद्मजा नलावडे, ऐर्श्वर्या नारकर, ऋजुता चव्हाण, अनुराधा वाघ या पाच महिला सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. निर्माता संघाच्या 50 व्या वर्षांच्या इतिहासात प्रथमच कार्यकारिणीत पाच महिला सदस्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही कार्यकारिणी  पाच वर्षांसाठी आहे. आजच्या निवडणूक प्रक्रियेसाठी 33 सदस्य उपस्थित राहिले. प्रदीप कबरे हे मुदतपूर्व निवडणूक सभेचे अध्यक्ष होते. संस्थेचे कायदेशीर सल्लागार समीर गुप्ते यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

प्रत्येक नाट्यगृहामागे समिती

सध्याच्या संकट काळात नाट्यगृहे त्वरित सुरू करण्यावर जोर देण्यापेक्षा कलाकार, प्रेक्षक आणि तंत्रज्ञ यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काय करता येईल, याचा पाठपुरावा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष काणेकर यांनी सांगितले. नाट्यगृह व्यकस्थापनाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक नाट्यगृहासाठी  स्थानिक पातळीवर समित्या गठीत केल्या जाणार आहेत. तसेच रंगमंच कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे  काणेकर यांनी सांगितले.

नव्या सदस्यांच्या प्रस्तावांना मान्यता

सध्या निर्माता संघात 50 हून अधिक सदस्य आहेत. नवीन सदस्यपदासाठी 20 अर्ज आलेले आहेत. यामध्ये मंगश कदम, शरद पोंक्षे, शेखर ताम्हाणे, संतोष पवार आदींच्या नावांचा समावेश आहे. हे प्रस्ताव गेल्या कार्यकारिणीत प्रलंबित राहिले होते. ते पुढील सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात येतील, अशी माहिती आज देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या