Ratnagiri News – सानवी भिंगार्डेची वीरगाथा ५:० मध्ये राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड, सुपर १०० यादीत स्थान

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वीरगाथा ५:० ’ राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी सानवी शशांक भिंगार्डे हिची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कविता लेखन गट (इयत्ता ३ री ते ५ वी) मध्ये तिचा समावेश संपूर्ण देशातील ‘राष्ट्रीय सुपर १०० ’ विजेत्यांमध्ये करण्यात आला असून रत्नागिरी जिल्ह्यातून ही निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

देशातील शूर सैनिक, वीर शहीद व त्यांच्या पराक्रमाची प्रेरणादायी ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा व सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करणे, हा ‘वीरगाथा’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यातून ‘सुपर १०० ’ मध्ये स्थान मिळवणे ही अत्यंत मानाची बाब मानली जाते.

सानवीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सुभाष बने, सचिव महाराष्ट्रीय शिक्षण संस्था, रोहन बने, संचालक पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल, तसेच प्राचार्य सोमीनाथ मिटकरी यांनी तिचा गौरव आणि अभिनंदन केले. तसेच देवरुख पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परिट, आणि विषयतज्ञ समीर काब्दुले, यांनी सानवीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

या यशाची दखल घेत डाएट कार्यालय, रत्नागिरी, तसेच दिल्ली येथूनही सानवीला कौतुकाचे व अभिनंदनाचे दूरध्वनी प्राप्त झाले असून तिच्या कर्तृत्वाची राष्ट्रीय पातळीवर प्रशंसा होत आहे. लवकरच सानवीला राष्ट्रीय स्तरावरही विशेष सन्मान व गौरव प्रदान केला जाणार आहे. सानवीच्या या यशामुळे पी. एस.बने इंटरनॅशनल स्कूल, साडवली, तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी, पालकांनी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सानवीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.