सरबज्योत सिंहचा ‘सुवर्ण’वेध; 10 मीटर एअर पिस्तोलमध्ये अचूक निशाणा

हिंदुस्थानी नेमबाज सरबज्योत सिंहने गुरुवारी जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात ‘सुवर्ण’वेध साधला. सरबज्योतने अंतिम फेरीत 242.7 गुण मिळवित सुवर्णपदकावर नाव कोरले.

22 वर्षीय सरबज्योत सिंहचे हे जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक होय. गतवर्षी भोपाळमध्ये झालेल्या या स्पर्धेत याच प्रकारात त्याने सुवर्णपदक जिंकले होते. याचबरोबर सरबज्योतने 2023 मध्ये बाकू येथे झालेल्या स्पर्धेतील एअर पिस्तोल प्रकाराच्या मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यंदाच्या स्पर्धेत पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या शुआईहांग बू याला 242.5 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यजमान जर्मनीचा रॉबिन वाल्टर 220 गुणांसह कास्यपदकाचा मानकरी ठरला.

सरबज्योतने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजविले, मात्र शुआईहांग बू याच्याकडून सरबज्योतला कडवी लढत मिळाली. दोघांमध्ये एक-एक गुणांसाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता, मात्र अजिबात विचलित न होता शांतचित्ताने सरबज्योतने या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक हिंदुस्थानच्या झोळीत टाकले. हिंदुस्थानच्या या नेमबाजाने गतवर्षी चांगवोन (कोरिया) येथे झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदकाची कमाई करीत हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिलेला आहे. या स्पर्धेतील गुणतक्त्यात हिंदुस्थानी संघ व सर्बिया संयुक्तपणे तिसऱया स्थानावर आहेत. चीनचा संघ चार सुवर्णांसह 9 पदकांची कमाई करीत अव्वल, तर फ्रान्स एक सुवर्ण व एक कास्यपदकासह दुसऱयास्थानी आहे.