पितरांचा ‘पाहुणचार’ करण्याच्या बेतात असलेले कोपरीवासीय आज चांगलेच ‘गॅस’वर गेले. जेसीबीचा धक्का बसून कोपरीतील पाचशे घरांमधील गॅस पुरवठा अचानक बंद झाल्याने पंचपक्वान्न बनवण्याच्या तयारीत असलेल्या गृहिणींची चांगलीच गोची झाली. आता वाडी दाखवायची कशी? असे टेन्शन आलेल्या अनेकांनी गॅस सिलिंडरची शोधाशोध केली, तर काहींनी चक्क हॉटेलमध्ये ऑर्डर देत पितरांना खूश करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरी अनेकांच्या पितरांना उपाशीच ढेकर देण्याची वेळ आली.
पितृपक्षातील अमावास्या सर्वात महत्त्वाची असून पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण या दिवशी दाखवले जाते. पितृदोषातून मुक्ती मिळावी यासाठी वाडी ठेवण्याची प्रथा आहे. मात्र ठाण्यातील कोपरी परिसरातील नाखवा स्कूलजवळ, काशी आई मंदिराच्या बाजूला ड्रेनेज लाइनचे काम सुरू असतानाच जेसीबीचा धक्का लागल्याने गॅसलाइनला गळती लागल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. त्यामुळे परिसरातील 500 पेक्षा अधिक कुटुंबीयांचा गॅस पुरवठा बंद झाला. ऐन सर्वपित्री अमावास्येला जेवणाची लगबग सुरू असताना अचानक गॅस पुरवठा बंद झाल्याने महिलांची
धावपळ उडाली.
विकासकाच्या विरोधात संताप
कोपरीत हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून विकासकाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती कोपरी अग्निशमन दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी, कोपरी पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान त्वरित दाखल झाले.
महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी गॅस पाइपलाइनचा मुख्य व्हॉल्व बंद केला. तसेच गॅस पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले.
गॅस पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर गॅस पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या वतीने देण्यात आली आहे.