सातारा जिह्यात आठ लाख टन साखर शिल्लक, केवळ तीन लाख टन साखरेची विक्री

सातारा जिह्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गाळप सुरू असलेल्या 14 कारखान्यांनी 60 लाख 29 हजार 162 टन उसाचे गाळप करून 64 लाख 43 हजार 445 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले असले, तरी विक्री कमी झाली आहे. यामुळे साखर कारखान्याच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. सातारा जिह्यात एकीकडे 8 लाख टन साखर शिल्लक असताना दुसरीकडे केवळ 3 लाख 5 हजार 909 टन साखरेची विक्री झाली आहे.

सातारा जिह्यात ऊसगाळप जोरात सुरू आहे. यंदा तोडणीयंत्राचा अभाव व मजुरांची कमतरता यामुळे हंगाम लांबला. या हंगामात सर्व कारखान्यांनी 60 लाख 29 हजार 162 टन उसाचे गाळप करून 64 लाख 43 हजार 445 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. परंतु, कारखान्यांच्या साखरेला बाजारात उठाव नसल्याने जिह्यात फक्त 3 लाख 5 हजार 909 टन साखरेची विक्री झाली आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतरही देशात साखरेची मागणी एकदम कमी झाली. ऐन दिवाळीच्या सण-उत्सवाच्या मोसमात दरवर्षीसारखा उठाव झाला नाही. कोरोनामुळे रोजगार गेले, अनेकांची पगारकपात झाली. याचा परिणामही साखरेवर झाला असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, इंडोनेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या देशांमध्ये साखर निर्यात न झाल्याने साखरविक्रीवर परिणाम झाला आहे.

देशांतर्गत बाजारपेठेतही साखरेच्या किमती कमी आहेत. सध्या 3100 रुपये क्विंटलने साखरेची विक्री केली जात आहे. लाखो टन साखर उत्पादित होत असताना बाजारपेठ नसल्याने गोदामांमध्ये साखर पडून आहे. अनेक कारखान्यांचा साखरेचा मागील साठा शिल्लक आहे. वेळेवर साखरेचा उठाव होत नसल्याने कारखान्याचा दैनंदिन खर्च, कामगारांचे वेतन, वीजबिल, यंत्रदुरुस्ती, कर्जाचे हफ्ते, शेतकऱयांची एफआरपी यांसह अन्य देणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

इथेनॉलनिर्मिती होणे गरजेचे

n सातारा जिह्यात 14 साखर कारखाने कार्यरत असून, मोजकेच कारखाने इथेनॉलची निर्मिती करतात. अनेक कारखाने साखर उत्पादनच करतात. यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळेच इथेनॉलनिर्मिती करण्यावर भर देणे अपेक्षित आहे. चांगल्या ग्रेडचे इथेनॉलनिर्मिती केल्यास शेतकऱयांना चांगला दर देण्याबरोबरच आर्थिक अडचणीतून कारखाने बाहेर येण्यास मदत होईल, असा सहकारतज्ञांचा अंदाज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या