
सातारा येथील खासगी क्लासचालक समीर बाबासाहेब मुजावर (वय 38, रा. करंजे नाका, सातारा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) 20 वर्षांची शिक्षा ठोठावली. 2018 मध्ये घडलेल्या या घटनेने जिह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, याच आरोपीस आणखी एका गुह्यातही शिक्षा लागली आहे.
समीर मुजावर याचा साताऱयात परिवर्तन नावाचा खासगी क्लास होता. या क्लासमधील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने 2015 ते 2017 या कालावधीत ठिकठिकाणी अत्याचार केले. पीडित मुलीला त्याने फूस लावून तिचे अपहरणही केले होते. तसेच, अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवणे, व्हिडीओ बनवल्याची धमकी देणे या सर्व घटनांची माहिती समोर आल्यानंतर साताऱयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 2017 साली सातारा शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार मुलींच्या आईने व 2018 साली अत्याचारप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीची तक्रार आल्यानंतर स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर शाहूपुरीच्या केसमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे व शहर पोलीस ठाण्याच्या केसमध्ये महिला फौजदार वर्षा डाळिंबकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही गुह्यांत एकच आरोपी असल्याने एकत्रित या खटल्याची सुनावणी झाली.
सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मंजुषा तळवलकर यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी आरोपी समीर मुजावर याला दोन्ही गुह्यांत एकूण 20 वर्षे व 57 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, दोन्ही घटनांत 14 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीमुळे आरोपीला शिक्षा लागण्यास मदत झाली. आरोपीला त्याचवेळी अटक केली असून, तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस अविनाश पवार, शमशुद्दीन शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले.


























































