
एकतर्फी प्रेमातून सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी एका माथेफिरू अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला अडवून गळ्याला चाकू लावला. नागरिकांनी व पोलिसांनी प्रसंगावधान राखत मुलीची सुटका केली. माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माथेफिरू मुलगा बारावीला आहे. या आधीही त्याने एका अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता. ही बाब समजल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी माथेफिरूला समज दिली होती. मात्र, आज पुन्हा त्याने तसेच कृत्य केले. मुलगी राहत असलेल्या इमारतीजवळ तो घुटमळत होता. दुपारी चारच्या सुमारास मुलगी इमारती खाली येताच तो मुलीच्या जवळ गेला. मुलीने घाबरून आरडाओरड केली. तेवढय़ात एका हाताने त्याने मुलीचा गळा दाबला आणि दुसऱया हातात असलेला चाकू मुलीच्या गळ्याला लावला.
तब्बल 5 मिनिटे चालला थरार
नागरिकांचा जमाव पाहून माथेफिरू आणखी बिथरला. कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. नागरिक त्याला समजावत होते. मात्र, तो कोणाचेही ऐकत नव्हता. 15 मिनिटानंतर जमावातील एका नागरिकाने आणि पोलिसांनी माथेफिरूचा ताबा मिळवत मुलीची सुटका केली. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शाहूपुरी पोलिसांकडून माथेफिरू अल्पवयीन मुलाची पार्श्वभूमी, त्याची मानसिक स्थिती याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर सातारा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱया मुलींच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.