…तर आयुष्यभर भुवयासुद्धा ठेवणार नाही! उदयनराजे यांचे निवडणूक आयोगाला ‘ओपन चॅलेंज’

37
udayanraje-bhosale-koregaon

सामना प्रतिनिधी । मुंबई

सातारा लोकसभा मतदारसंघातून मी खासदार म्हणून निवडून आलो असलो तरी ‘ईव्हीएम’ मशीननुसार झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदानापेक्षा मतमोजणीत जास्त मते मिळाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम’मध्ये घोळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघात पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या, मतदानात फरक आला नाही तर मिश्याच काय, आयुष्यभर भुवयासुद्धा ठेवणार नाही असे सांगत खासदार उदयनराजे यांनी आज निवडणूक आयोगाला ‘ओपन चॅलेंज’च दिले.

मुंबई प्रेस क्लब येथे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’मुळे मोठा घोळ झाल्याचे सांगितले. या ठिकाणी आपण कोणताही पक्ष किंवा खासदार म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून ‘ईव्हीएम’मधील घोळ समोर आणत असल्याचे सांगितले. सातारा मतदारसंघात ‘ईव्हीएम’च्या घोळामुळे आपले दीड ते अडीच लाखांवर मताधिक्य कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. झालेले मतदान आणि मतमोजणी यात एकूण 6702 मतांचा फरक आढळला आहे. हे आपण सांगत नसून कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱयांनी दिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. देशातही झालेले मतदान आणि मतमोजणीत जास्त मते आल्याचा गेंधळ समोर येत असल्यामुळे निवडणूक आयोगाने वेबसाइटवरून ही माहिती हटवली असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘ईव्हीएम’मुळे आपली लोकशाही आणि देशही धोक्यात असल्याचे ते म्हणाले.

राजीनामा द्यायला तयार

मी उगाच तोंडाच्या वाफा घालवत नाही. मी प्रामाणिकपणे खरं बोलतोय. मी राजीनामा द्यायला तयार आहे. निवडणूक आयोगाने माझं ओपन चॅलेंज स्वीकारावं. पराभव होऊन बोललो असतो तर ठीक होतं, पण निवडून येऊनही बोलतोय. मी रडीचा डाव खेळत नाही. आज छातीठोकपणे सांगतो या लोकशाहीचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सगळ्या लोकप्रतिनिधींना आज सामान्य माणूस म्हणून विनंती करतो, जे माझं मी मत व्यक्त करतोय यावर चर्चा घडवून आणा, असे आवाहनही उदयनराजे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या