शिवथरमधील आरोपीला आठ तासांत अटक; प्रेमसंबंधातून विवाहितेचा गळा चिरून खून, सातारा तालुका पोलिसांची कामगिरी

प्रेमसंबंधातून प्रियकरानेच विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी भरदिवसा सातारा तालुक्यातील शिवथर येथे घडली. तथापि, सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी विद्युतवेगाने तपासाची चक्रे फिरवून आठच तासांत आरोपीस अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अक्षय रामचंद्र साबळे (वय 28, रा. शिवथर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पूजा प्रथमेश जाधव (वय 27) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

शिवथर ते मालगाव रस्त्यावर गावापासून जवळच जाधव यांचे घर आहे. या परिसरात मोजकीच घरे आहेत. सोमवारी पूजा घरी एकटीच असताना दुपारी 12च्या सुमारास गळा चिरून तिचा खून करण्यात आला होता. दुपारी चार वाजता खुनाची घटना उघड झाली. खुनाच्या घटनेमुळे शिवथरसह परिसर हादरून गेला.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी तत्काळ तपासाची चक्रे गतिमान केली. गुह्यासंदर्भात विविध शक्यता पडताळून त्यांनी गावात चौकशी केली. यावेळी पूजाचे अक्षय साबळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे धागेदोरे हाती लागले. अक्षयला संपर्क साधला असता, मोबाईल बंद लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर नीलेश तांबे यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपीच्या मागावर रवाना केले. या पथकाने रात्री साडेअकराच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावरून अक्षयला अटक केली. आज सातारा न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मृत पूजाचे माहेर शिवथर हेच असून, सात वर्षांपूर्वी गावातील प्रथमेश जाधव याच्यासोबत तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना यश नावाचा मुलगा आहे. तथापि, गावातीलच अक्षय साबळे याच्यासोबतही गेल्या चार-पाच वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध होते. त्याने तिच्याकडे लग्न करण्यासाठी लकडा लावला होता. सोमवारी दुपारी पूजाने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या अक्षयने तिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.

पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, राजू शिखरे, संदीप पांडव, प्रदीप मोहिते, दादा स्वामी, पंकज ढाणे, मनोज गायकवाड यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.