
फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील विवाहिता दीपाली अजिंक्य निंबाळकर यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी ‘त्या’ महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता, असा गंभीर आरोप विवाहितेच्या आई-वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
वाई तालुक्यातील बावधन येथील भाग्यश्री पाचगणे आणि त्यांचे पती मारुती बाजीराव पाचगणे यांनी आज अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडवकर यांची भेट घेऊन आपली मुलगी दीपाली निंबाळकर हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विवाहिता दीपाली यांच्या आई-वडिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. या प्रकरणात चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता. मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांपर्यंत पोलिसांनी अहवाल दिला नाही. अहवालावर सही असलेल्या महिला डॉक्टर या आत्महत्या केलेल्या त्याच डॉक्टर होत्या. त्या महिला डॉक्टरवर राजकीय दबाव टाकण्यात आला होता.’
महिला डॉक्टरवर दबाव टाकणारा कोण?
दीपालीच्या आई भाग्यश्री पाचगणे म्हणाल्या, ‘मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल रोखून ठेवला होता. राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगनमतामुळे सत्य दडपलं गेलं. संबंधित महिला डॉक्टरवर चुकीचा अहवाल देण्यासाठी दबाव होता. तो दबाव टाकणारा कोण? हे स्पष्ट झाले पाहिजे. कारण महिला डॉक्टरनेही आपल्या आत्महत्येच्या पत्रात अशाच प्रकारच्या दबावांचा उल्लेख केला आहे.’
ही आत्महत्या नसून हत्या – सुषमा अंधारे
‘फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणि बीड जिह्यातील रहिवासी असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? आम्हाला तिची हत्या झाल्याचा संशय आहे. हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमधील हस्ताक्षर तिचे नव्हतेच, असे तिची बहीण सांगत आहे. ती बीडची आहे म्हणून तिचा जीव घेतला का? भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावामुळेच हा प्रकार घडला आहे,’ असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘याप्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात यावी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, त्यांचे दोन स्वीय सहायक आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.





























































