सासपडेतील दगड खाणींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वेळीच कारवाई करा अन्यथा आंदोलन; नागरिकांचा इशारा

साताऱ्यातील सासपडे येथील दगड खाणींमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीमुळे पिकांचे नुकसान होऊन जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरी, तलावांची पाणीपातळी खालावली आहे. रात्री-अपरात्री ब्लास्टिंग करून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. लोकांच्या समस्या तातडीने न सोडवल्यास तीक्र आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत गावकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे.

पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून सासपडेत दगड खाणकाम सुरू आहे. महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, रानातील विहिरी कोसळल्या आहेत. नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत असून, जनावरांच्या चाऱयावर गदा आली आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. ब्लास्टिंगच्या धक्क्यांमुळे विहिरी व तलावांची पाणीपातळी खालावली आहे. रात्रंदिवस ब्लास्टिंग करून नियमांची पायमल्ली चालवली आहे. ओव्हरलोडच्या वाहनांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बेदरकारपणे गौण खनिजाची वाहतूक केल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फोगर यंत्रणा बसवावी. शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी. गौण खनिजावर पाणी मारावे व वाहतूक नेटने झाकून करावी. निरुपयोगी बादाड, डस्ट ओढय़ाच्या प्रवाहात सोडू नये. शेत रस्त्यांची सुधारणा करावी. रॉयल्टीतून शेतरस्ते व बाधित जमिनीचा विकास करावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.