
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीकर सातारा तालुका हद्दीतील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सलग तीन दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी यादीवरील गुन्हेगारांची तपासणी केली. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसाही जागीच बजावल्या.
पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांच्यासह 10 पोलीस अंमलदार, सीमा सुरक्षा बल गटाचे 4 अधिकारी, 25 जवान, लाठी, शस्त्रांसह या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. सातारा तालुक्यातील आसगाव येथे दुपारी 1 ते 2 या कालावधीत पारधी वस्तीत तपासणी करण्यात आली. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या ठावठिकाणाची माहिती पोलिसांच्या पथकाने घेतली. ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी विविध पथके तैनात केली आहेत. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातूनही निवडणुकीत सलोखा राहावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने ही कारवाई करण्यात येत आहे.
कोंडके, मरडे, लिंब, पाटखळ गावांत रूट मार्च
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडके, मरडे, लिंब, पाटखळ या गावांत रूट मार्च घेण्यात आला. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गाककऱयांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत, कायद्याचे पालन व्हावे, यासाठी या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. तसेच देगाव, चिंचनेर कंदन या गावांतही पोलीस अंमलदार, सीमा सुरक्षा बलाचे जवान सहभागी झाले होते. कोणत्या गावात कोणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याची सर्व माहिती घेऊन पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. त्यांचा सध्याचा पत्ता, नेमके काय काम केले जाते, याची. माहिती घेऊन त्याच्या नोंदी करण्यात आल्या.