Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतले आणि पाकिस्तान, पीओकेमध्ये घुसून कारवाई केली. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे हल्ले परतवून लावत हिंदुस्थानने पाकिस्तानच्या एअरबेसवर प्रतिहल्ला केला.

हिंदुस्थानने पाकिस्तानचे जवळपास 11 एअरबेस उद्ध्वस्त केले. यात सरगोधा, नूरखान, भोलारी, जकोबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान या प्रमुख एअरबेसचाही समावेश आहे. पाकिस्ताननेही याची कबुली दिली असून आता याचे सॅटेलाईट फोटोही समोर आले आहेत.

1. सुक्कूर एअरबेस

सिंध प्रांतात असलेले सुक्कूर एअरबेस हिंदुस्थानच्या हवाई हल्ल्यात बेचिराख झाले आहे. सॅटेलाईट फोटोंवरून या एअरबेसवरील महत्त्वाच्या इमारतींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

2. नूरखान एअरबेस

रावळपिंडी आणि इस्लामाबाद दरम्यान असलेला हा महत्त्वाचा एअरबेस हिंदुस्थानने उडवला. 1971 च्या युद्धातही हिंदुस्थानने या एअरबेसवर हल्ला चढवला होता. सॅटेलाईट फोटोंवरून या एअरबेसचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

3. रहीम यान खान एअरबेस

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेला हा एअरबेस बहावलपूरपासून 200 किलोमीटर दक्षिणेस आहे. हिंदुस्थानने केलेल्या हवाई हल्ल्यात या एअरबेसच्या धावपट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हवाई हल्ल्यामुळे धावपट्टीवर मोठा खड्डा पडल्याचे सॅटेलाईट फोटोत दिसत आहे.

4. सरगोधा एअरबेस

पाकिस्तानी हवाई दलाच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा हा एअरबेस लाहोरच्या पश्चिमेस आणि पंजाब सीमेपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानने येथील दोन्ही धावपट्ट्यांना लक्ष्य केले.

हे वाचा – पाकिस्तानचा कबुलनामा! हिंदुस्थानच्या कारवाईत पाकचे 11 सैनिक ठार, 78 जखमी; हवाई दलाच्या 5 अधिकाऱ्यांचा समावेश

5. जकोबाबाद एअरबेस

हा एअरबेस आंतरराष्ट्रीय सीमेपासून 200 किलोमीटर अंतरावर असून या एअरबेसवरील हँगरला हिंदुस्थानने टार्गेट केले. हँगर म्हणजे अशी जागा जिथे विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते.

6. भोलारी एअरबेस

हा पाकिस्तानचा नवीन एअरबेस असून 2017 पासून कार्यरत झाला होता. हिंदुस्थानने हवाई हल्ला करत या एअरबेसच्या हँगरला लक्ष्य केले. यात मोठे नुकसान झाल्याचे सॅटेलाईट फोटोतून दिसते.