
सामना ऑनलाईन । राहुरी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहुरीच्या नगर मनमाड राज्य मार्गावर आंदोलकांनी सत्यनारायणाची महापूजा घातली. या महापूजेनंतर भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूडाचा तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी नऊ पासून आंदोलन करण्यात येत आहेत.
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा समाजातील हजारो तरूणांनी भगवे झेंडे खांद्यावर घेऊन आज सकाळी नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ रस्त्यावर ठाण मांडून आंदोलनाला सुरवात केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगर मनमाड राज्य मार्गावरून मराठा समाजातील हजारो तरूणांनी मोटरसायकल रॅली काढली. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांच्या जयजयकाराने राज्य मार्गावरील परिसर दुमदुमून गेला होता. याचदरम्यान काही आंदोलकांनी नगर मनमाड राज्य मार्गावर आंदोलकांनी महापूजा घातली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देव सुबुध्दी देवो हे साकडे घालत अंबाबाईचे जागरण गोंधळ देखील केला.
आंदोलना दरम्यान राज्य मार्गावरून नगर दिशेला रूग्णांना घेऊन जाणा-या रूग्णवाहिकांना आंदोलकांनी रस्ता मोकळा करून देत माणुसकीचे दर्शन घडवून दिले. गुरूवारी होणारा राहुरीचा आठवडे बाजार तसेच दुध संकलन केंद्र व इतर खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने तब्बल १ कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.



























































