सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठीप्रेमी पालकांचे महासंमेलन येत्या 8 व 9 डिसेंबरला गोरेगाव पश्चिम येथील महाराष्ट्र विद्यालयात होणार आहे. या संमेलनात मराठी शाळांपुढील महत्त्वाचे प्रश्न आणि मागण्या याबद्दलचे ठराव तयार करून ते शासनाला सादर करण्यात येणार आहेत.

मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिर संस्थेचे महाराष्ट्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सजग आणि सुजाण नागरिकत्वासाठी हे संमेलन होणार आहे. दोन दिवस चालणारे हे संमेलन सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, अद्ययावत सुविधांनी आणि अधिक गुणवत्तापूर्ण प्रयोगशील शिक्षण पद्धतीने मराठी शाळा परिपूर्ण करणे ही काळाची गरज आहे.या प्रक्रियेत संस्थाचालक, शिक्षक हे नेहमीच मोलाची भूमिका पार पाडत असतात. त्यांच्याबरोबरीने आता पालकांनीही सक्रिय भूमिका घ्यावी या उद्देशाने हे महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे.

संमेलनाची माहिती देण्यासाठी नुकतीच संमेलन पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला संमेलनाचे समन्वयक डॉ. वीणा सानेकर, आनंद भंडारे, नूतन विद्यामंदिर संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या शेवडे, द शिक्षण मंडळ गोरेगावचे प्रमुख गिरीश सामंत, वंदे मातरम शिक्षण संस्थेचे प्रमुख फिरोझ शेख, मी मराठी संस्थेचे प्रमुख रामचंद्र एमिटकर, भंडारी एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्गचे संचालक विजय पाटकर, अक्षरयात्रा वाचनालयाचे प्रदीप पाटील, नंदादीप विद्यालय, अ भि गोरेगावकर शाळा, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ इ. संस्थांचे मान्यवर आणि पालक उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे उपक्रम दाखविणारी दालने, प्रकाशकांचे ग्रंथप्रदर्शन, चर्चासत्रे, मुलाखती, संवादात्मक स्वरूपातील कार्यक्रम या संमेलनात होणार अहेत.

राजभाषा मराठीविषयी प्रेम असणाऱया प्रत्येकाने या महासंमेलनाला उपस्थित राहावे.

तसेच संमेलनाच्या अधिक तपशिलासाठी संमेलन समन्वयक संपर्क:

आनंद भंडारे (9167181668),

मनोज वेंगुर्लेकर (9322014659),

संजीव करमरकर (9082849650)

आपली प्रतिक्रिया द्या