एकच विद्यार्थी आला, वर्ग भरला अन् कोरोना हरला!

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी

शाळेच्या गणवेषात पाठीवर दप्तर, हातात सॅनिटायझरची बाटली आणि तोंडावर मास्क घालून विद्यार्थी आज शाळेत दाखल झाले. कोरोनाच्या काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू झाल्या. इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग आज भरले. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला असून विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजनची तपासणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात 204 शाळांमध्ये 7 हजार 917 विद्यार्थी उपस्थित होते. रत्नागिरी शहरातील अ.के.देसाई हायस्कूल मध्ये नववी आणि दहावीच्या वर्गात प्रत्येकी एक विद्यार्थी आला. तो एकच विद्यार्थी आला, वर्ग भरला अन् कोरोना हरला.

राज्यातील 9 वी ते 12 वीचे वर्ग आजपासून सुरू झाले. वर्ग सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तसेच शाळेतील वर्गखोल्या सॅनिटाईज करण्यात आल्या. आज सोशल डिस्टन्सिंग ठेऊन वर्ग सुरू करण्यात आले. आज इंग्रजी,गणित आणि विज्ञानच्या तासिका घेण्यात आला.

पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत आले नसले तरी हळूहळू उपस्थितीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी शहर आणि परिसरातील शाळांना भेटी देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही याबाबत पहाणी केली.

204 शाळा भरल्या, 7 हजार 917 विद्यार्थी हजर!

जिल्ह्यात आज 454 शाळांपैकी 204 शाळा भरल्या. शाळेत नववी ते बारावी पर्यंत 7 हजार 917 विद्यार्थी हजर होते. सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती ही गुहागर तालुक्यात होती. गुहागरात 29 शाळांमध्ये 1672 विद्यार्थी, मंडणगडात 24 शाळांमध्ये 619 विद्यार्थी, दापोलीत 11 शाळांमध्ये 547 विद्यार्थी, खेडमध्ये 34 शाळांमध्ये 738 विद्यार्थी, संगमेश्वरात 22 शाळांमध्ये 1648 विद्यार्थी, रत्नागिरीत 29 शाळांमध्ये 86 विद्यार्थी, लांजात 13 शाळांमध्ये 916 विद्यार्थी आणि राजापूरात 9 शाळांमध्ये 462 विद्यार्थी उपस्थित होते.

वर्गात विद्यार्थी एक…

उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग आजपासून सुरू झाले तरी अनेक पालकांनी कोरोनाच्या भीतीपोटी पाल्यांना शाळेत पाठवले नाही. असे असताना रत्नागिरीतील अ.के.देसाई हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात एक आणि दहावीच्या वर्गातही एकच विद्यार्थी आला असतानाही शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले. इंग्रजी, विज्ञान, गणित आणि भूमितीच्या तासिका घेत शैक्षणिक क्षेत्रातील कोविडयोध्द्यांनी कोरोनाला आव्हान दिले आहे.

रत्नागिरी शहरातील अ.के.देसाई हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात पार्थ आमटे आणि दहावीच्या वर्गात  अल्तमश मिरकर हे दोघेच विद्यार्थी आले. दोन विद्यार्थी आले तरी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद शेखर यांनी वर्ग सुरू केले. शिक्षक संतोष गार्डी आणि वृषाली सावंत यांनी एका विद्यार्थ्याला तितक्याच उत्साहाने ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले. इंग्रजी, भूमिती, आणि विज्ञानाच्या तासिका घेण्यात आल्या. 60 आसन क्षमता असलेल्या वर्गात एकच विद्यार्थी उपस्थित असतानाही शिक्षकांचा शिकविण्याचा उत्साह कायम होता. शाळेत सोशल डिस्टन्सिंग म्हणून दोन्ही वर्गासाठी ये-जा करण्यासाठी दोन मार्ग तयार करण्यात आले आहेत. उद्यापासून विद्यार्थी संख्या वाढेल अशी अपेक्षा मुख्याध्यापक प्रमोद शेखर यांनी व्यक्त केली.

घरी कंटाळलो होतो

मार्च महिन्यापासून शाळा बंद होती त्यामुळे घरी कंटाळलो होतो. शाळा सुरू व्हायची वाट पहात होतो म्हणून आज पहिल्याच दिवशी शाळेत आलो. वर्गात मी एकटाच असलो तरी मला कंटाळा आला नाही. मी माझ्या मित्रांना फोन केला होता, ते सध्या गावी आहेत पण ते लवकरच शाळेत येतील, असे इयत्ता दहावीतील अल्तमश मिरकर म्हणाला.

उजळणीही घेणार

लॉकडाऊन मध्ये शिकवले त्याच्या पुढचा भाग शाळेत शिकवताना ऑनलाईन अभ्यासक्रमाची आम्ही उजळणी घेणार आहोत, असे शिक्षक संतोष गार्डी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या